पालिकेची गळती पोहोचली विधानसभेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 01:47 AM2018-07-21T01:47:11+5:302018-07-21T01:47:24+5:30
महापालिकेच्या नव्या विस्तारित इमारतीच्या उद््घाटनाच्या कार्यक्रमात झालेली गळती काही पदाधिकारी व प्रशासनाची पाठ सोडायला तयार नाही.
पुणे : महापालिकेच्या नव्या विस्तारित इमारतीच्या उद््घाटनाच्या कार्यक्रमात झालेली गळती काही पदाधिकारी व प्रशासनाची पाठ सोडायला तयार नाही. आमदार डॉ. नीलम गोºहे यांनी याविषयावर नागपूर येथे अधिवेशनात लक्षवेधी सूचना केली व त्याची दखल घेत पालकमंत्री गिरीश बापट यांना संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन द्यावे लागले.
महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने इमारतीचे काम पूर्ण झाले नसतानाही उपराष्ट्रपती व्यंंकय्या नायडू यांच्या हस्ते उद््घाटन केले. नेमका त्याच दिवशी जोराचा पाऊस झाला व इमारतीच्या छतामधून गळती सुरू झाली. कार्यक्रम सुरू असतानाच असे झाल्याने महापालिकेची नाहक बदनामी झाली, विरोधकांनी कामे अपूर्ण असून कार्यक्रमाची घाई करू नये असे लक्षात आणून दिले असतानाही त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष का केले? अशी विचारणा डॉ. गोºहे यांनी केली होती.
कोथरूड, मुंढवा व बाणेर येथील काही जमिनींच्या आरक्षणासंदर्भात सरकारकडे काही निवेदने मिळाली आहेत. त्याबाबतच्या सूचना व हरकती विचारात घेऊन संबंधिताची सुनावणी घ्यावी व त्याचा अहवाल सरकारला द्यावा असे आदेश नगररचना विभागाला देण्यात आले आहेत. तो प्राप्त झाल्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल अशी माहिती बापट यांनी दिली. कोथरूड येथील सर्व्हे क्रमांक १५९, १६० व १६७ याच्या काही भागाचा निवाडा झाला आहे. शिवणे गावच्या पूरग्रस्तांसाठी ही जागा आहे. त्यावरील खेळाचे मैदान, अग्निशामक दल व प्राथमिक शाळा यांच्या आरक्षणाचा फेरविचार व्हावा, अशी विनंती सरकारला करण्यात आली, आहे असे बापट म्हणाले.
पालकमंत्री गिरीश बापट यांनी त्याला उत्तर देताना, उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत पुणे महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये पावसामुळे झालेल्या गळतीचा अहवाल प्राप्त होताच दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे सांगितले. घुमटाकार छतातून पाण्याची गळती तेव्हाही झाली नव्हती व आताही होत नाही. तथापि गळतीचा सर्व परिसर अभियंत्यांकडून तपासण्यात येत आहे. त्यांचा अहवाल मिळाल्यानंतर दोषी कोण आहे हे लक्षात येईल. त्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे बापट यांनी सांगितले.