लेकानं जिंकलं... शेतकऱ्याचं पोरगं फौजदार झालं अन् बापाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू आले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 05:36 AM2022-03-27T05:36:15+5:302022-03-27T05:36:49+5:30
पुण्यातील नीलेश बर्वे राज्यात पहिला
पुणे : स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून ग्रामीण भागातील मुले मोठे साहेब होतात. गावातून त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. मग आपल्याही मुलाने एमपीएससीची तयारी करून साहेब व्हावे, अशी इच्छा आई-वडील व्यक्त करतात. तीच इच्छा पूर्ण करत नीलेश बर्वे याने फौजदार परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याने शेतकरी पित्याच्या डोळ्यांतून घळाघळा आनंदाश्रू वाहिले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या पीएसआय परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. त्यात पुण्यातील चास (ता. आंबेगाव) येथील नीलेश बर्वे हा राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. या यशाचा आनंद कुटुंबियांनी व मित्रांनी जल्लोषात साजरा केला.
लहानपणापासून हुशार असलेल्या नीलेशने गुणवत्तेच्या जोरावर अवसरी येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवला. २०१३मध्ये पदवी घेतल्यानंतर पुण्यात येऊन खासगी अभ्यासिकेत समन्वयक म्हणून काम केले.
नीलेशने दररोज बारा तास अभ्यास केला. मित्रांबरोबर दुपारी दोन ते पाच यावेळेत चर्चा करून अभ्यास केला. राज्यसेवा परीक्षेसह पीएसआय परीक्षेची तयारी केली. तीनवेळा मुख्य परीक्षा देऊनही यश मिळाले नाही. २०१९च्या परीक्षेत प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि यश संपादन केले.
प्रयत्न थांबणार नाहीत
पीएसआय झालो म्हणून थांबणार नाही, तर आता उपजिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, गटविकास अधिकारी आदी पदांवर नियुक्तीसाठी अभ्यास करत आहे. मोठा साहेब होण्याचे आई-वडील आणि आजोबांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करेन.
- नीलेश बर्वे