जुन्नर तालुक्यातील नेहरकवाडी येथे धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 07:14 PM2020-01-24T19:14:07+5:302020-01-24T19:17:44+5:30
जुन्नर तालुक्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
जुन्नर : येडगाव येथील नेहरकरवाडी येथे गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला शुक्रवारी ( दि.२३) पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास जेरबंद करण्यात वनखात्याला यश आले आहे. जुन्नर तालुक्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, बिबट्यांकडून पाळीव प्राण्यांवर सातत्याने हल्ले होत आहेत. जुन्नर तालुक्यातील नेहरकवाडी या ठिकाणी बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका धनगराच्या मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला करुन दोन मेंढ्या ठार केल्या होत्या. यापूवीर्ही अशाच घटना घडल्या होत्या. त्यामुळे या ठिकाणी पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली होती. या मागणीवरुन वनखात्याने गुरूवारी रात्री सुरज नेहरकर, आदेश नेहरकर, प्रथमेश नेहरकर, अर्जुन नेहरकर यांच्या मदतीने येथील शेतकरी संतोष नेहरकर व भगीरथ नेहरकर यांच्या शेतात हा पिंजरा लावण्यात आला होता. या पिंजऱ्यात हा बिबट्या पहाटे जेरबंद झाला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर वनखात्याचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन या माणिकडोह येथील बिबट्या निवारण केंद्रात हलविले असल्याने समजते. परिसरात अजून दोन बिबटे असण्याची शक्यता असून वनखात्याने या ठिकाणी पुन्हा पिंजरा लावावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.