खेड तालुक्यात पुन्हा बिबट्याचा हल्ला; जऊळके खुर्दमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात महिला रक्तबंबाळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 10:03 AM2022-05-12T10:03:50+5:302022-05-12T10:10:47+5:30
या हल्ल्यात महिला गंभीर जखमी
राजगुरुनगर : गेल्या काही दिवसांपासून खेड तालुक्याच्या पुर्व भागातील रेटवडी, जऊळके या परिसरात बिबट्याने धुमाकुळ घातला आहे. जऊळके (ता. खेड) येथे आज दि. १२ पहाटे साडेपाच वाजता बिबट्याने एका महिलेवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात महिला गंभीररित्या जखमी झाली असून उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे.
जऊळके खुर्द येथील वरची वस्ती येथे आज पहाटे लता शिवाजी बोऱ्हाडे (वय ५० ) या महिलेवर घराशेजारीच नरभक्षक बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात महिलेच्या डोक्याला पाठीमागच्या बाजूने गंभीर खोलवर जखमा झाल्या आहेत. हल्ल्यानंतर महिला जाग्यावरच कोसळली. त्यानंतर तत्काळ उपचारासाठी त्यांचा मुलाने चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. या घटनेची खबर वन विभागाला देण्यात आली.
वनरक्षक शिवाजी ढोले, एस, के,अरुण यांनी ग्रामिण रुग्णालयात धाव घेतली. महिलेच्या डोक्याला खोलवर जखम असल्याने व मोठा रक्तस्राव झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आले. रेटवडी, जऊळके हा परिसर दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे. दोन दिवसांपूर्वी रेटवडी येथे दोन महिलावर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. आज पुन्हा बिबट्याने हल्ला केल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी होत आहे.