दीड वर्षाच्या चिमुकल्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 08:51 PM2019-04-20T20:51:11+5:302019-04-20T20:54:08+5:30
ऊसतोडणी करणा-या दिलीप गणपत माळी यांच्या दीड वर्षाच्या वयाच्या मुलावर शुक्रवारी रात्री बिबट्याने जीवघेणा हल्ला करून जखमी केले.
ओतूर: धोलवड (ता.जुन्नर ) जवळील मुंढेवाडी येथे ऊसतोडणी करणा-या दिलीप गणपत माळी यांच्या दीड वर्षाच्या वयाच्या मुलावर शुक्रवारी रात्री बिबट्याने जीवघेणा हल्ला करून जखमी केले. या घटनेमुळे परिसरात दशहत पसरली आहे. जखमी मुलावर पिंपरीचिंचवड येथील वायसीएम रूग्णालयात उपचार सुरू आहे अशी माहिती वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी बापूसाहेब येळे यांनी दिली. ज्ञानेश्वर दिलीप माळी असे जखमी चिमुकल्याचे नाव आहे.
धोलवड व मुंढेवाडी सीमेवर ऊस तोडणी सुरु आहे. शुक्रवारी (दि १९) रात्री ऊसाच्या शेतातील मोकळ्या जागेत पंधरा ते वीस ऊसतोडणी कामगार झोपले होते. याच शेतात ऊसतोडणी कामगार दिलीप गणपत माळी व त्यांची पत्नी दिपाली दिलीप माळी झोपले होते. त्यांच्या मध्ये त्यांचा दीड वर्षाचा मुलगा ज्ञानेश्वर झोपला होता. अंधाराचा फायदा घेऊन रात्री दीडच्या सुमारास बिबट्याने मुलाच्या डोक्यावर डाव्या डोळ्यावर, कानावर पंजे मारून जखमी केले. त्यामुळे बाळ मोठ्याने रडू लागले. बाळाच्या आवाजाने आई दिपाली जागी झाली. बिबट्याला पाहताच तीने तीने धाडसाने बिबट्याला हाताने मारुन आरडाओरडा केला. तेव्हा सर्व कामगार जागे झाले. त्यांनीही आरडाओरडा केल्याने बिबट्या मुलाला सोडून शेतात पळाला.
या घटनेची माहिती ओतूर वनविभागाला कळविण्यात आली. ओतूर वनविभागाचे वनक्षेत्रपाल बापूसाहेब वेळे, वनपाल व्ही.आर. अडागळे, एच. एन. नागरगोजे, एच. एन. पवार, एस. एन. जराडे, वनमजूर फुलचंद खंडागळे, किसन केदार घटनास्थळी हजर झाले.
जखमी बाळाला व्ही.आर अडागळे व राठोड यांनी प्रारंभी ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पिंपरी चिंचवड येथील वाय सी.एम रुग्णालयात दाखल केले. जखमी बाळाची प्रकृती सध्या स्थिर आहे.
..............
वनपरिक्षेत्र अधिकारी व इतरांनी घटना स्थळाचा पंचनामा करून बिबट्यालाला जेरबंद करण्यासाठी तात्काळ पिंजरा लावण्यात आला आहे. पंचनामा करताना घटनास्थळी ऊसकामगारांची टोळी दिसून आली. आजूबाजूला ऊसाची शेती व जवळच नदी चे क्षेत्र आहे. रात्री दीड वाजता बिबट्याने आई वडिलांच्या मध्ये जखमी झालेले बाळ झोपले होते अंधाराचा फायदा घेऊन बिबट्याने हल्ला केला.