बिबट्याचा हल्ला; दुचाकीचालक जखमी
By admin | Published: January 31, 2015 12:22 AM2015-01-31T00:22:25+5:302015-01-31T00:22:25+5:30
मांदारणे (ता. जुन्नर) येथे मोटारसायकलस्वारावर बिबट्याने हल्ला केल्याने तो जखमी झाला आहे. त्याला ओतूर प्राथमिक
ओतूर/ उदापूर : मांदारणे (ता. जुन्नर) येथे मोटारसायकलस्वारावर बिबट्याने हल्ला केल्याने तो जखमी झाला आहे. त्याला ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी ‘वायसीएम’ हॉस्पिटल पिंपरी, पुणे येथे पाठविण्यात आले आहे. अशी माहिती वन परिक्षेत्र अधिकारी एस. एस. रघतवान यांनी दिले.
मांदारणे (ता. जुन्नर) येथील बाळासाहेब बबन महाकाळ (वय ४५ वर्षे) व त्यांची पत्नी सुरेखा बबन महाकाळ हे दोघे गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास उदापूर (ता. जुन्नर) या गावाकडून मांदारणे गावाकडे जात होते. तेव्हा मोटारसायकलचालक बाळासाहेब महाकाळ यांच्या मोटारसायकलवर झेप घेतली. तेव्हा महाकाळ यांच्या डोक्याला नखे लागून रक्तबंबाळ झाले. बिबट्याने हल्ला केल्याचे ओतूर येथील वनपाल एस. डी. वायभासे यांना तत्काळ लोकांनी कळविले. वनपाल एस. डी. वायभासे, उदापूरचे वनरक्षक एस. जी. मोमीन हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून
बाळासाहेब महाकाळ यांना वाय.सी.एम. हॉस्पिटल येथे उपचारासाठी पाठविले.
या परिसरात बिबट्यांचा वावर आहे. एक मादी व तिचे बछडे या परिसरात असावेत. रात्रीच्या वेळी मोटारसायकलचा आवाज व प्रकाश झोत यांमुळे बछड्यांना धोका वाटतो. म्हणून मादी अगर बिबट्या हल्ला करीत असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राना इम्युनोग्लोबीन ही लस नसल्याने अशा प्रकारे जंगली प्राण्यांनी हल्ले केले, तर त्यांच्यावर उपचार करता येत नाही. ती लस उपलब्ध करून घ्यावी व उदापूर मांदारणे परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)