आंबेगाव तालुक्यात बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 03:37 PM2019-04-02T15:37:50+5:302019-04-02T15:39:27+5:30
डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यानजीक असणा-या उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने ढोबळे यांच्यावर पाठीमागुन थेट हल्ला करत त्यांना जखमी केले.
आंबेगाव (निरगुडसर): आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील जारकरवाडी (ढोबळेवाडी) येथील शेतकरी रामभाऊ नारायण ढोबळे यांच्यावर बिबट्याने हल्ला करुन जखमी केल्याची घटना सोमवारी (दि.१)सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,रामभाऊ नारायण ढोबळे यांच्यावर सध्या पुणे येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार सुरू असुन त्यांची प्रकृती स्थिर आहे. आपल्या शेतातली दैनंदिन कामे आटपुन ढोबळे हे घराकडे परतत होते.डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यानजीक असणा-या उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने ढोबळे यांच्यावर पाठीमागुन थेट हल्ला करत त्यांना जखमी केले.या भयानक प्रसंगी ढोबळे यांनी घाबरुन न जाता आरडाओरडा करत बिबट्याचा प्रतिकार केला.त्यांच्या या प्रतिहल्ल्याने बिबट्याने शेजारच्या उसाच्या शेतात धुम ठोकली.यापुर्वी देखील बिबट्याने धनु धोंडिबा पाचपुते,विलास निवृत्ती पाचपुते,रामचंद्र नारायण ढोबळे,शिवराम रखमा ढोबळे यांच्या गाईच्या गोठ्यावर हल्ला करुन कालवडींचा फडशा पाडला होता.या परिसरात सध्या अशा घटना सतत घडत असल्याने दिवसाही लोकं शेतात काम करण्यास घाबरत आहेत.त्यात दिवसाचे लोडशेडिंग मुळे रात्री पिकांना पाणी द्यावे लागते.
.अशा भयभीत वातारणात किमान दिवसा लाईट उपलब्ध करून द्यावी आणि या परीसरात बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावावेत अशी मागणी भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामचंद्र ढोबळे, सरपंच रुपाली भोजणे, जारकरवाडी गावचे उपसरपंच श्री. बाळासाहेब ढोबळे, ग्रामपंचायत सदस्या,डॉ.मनिषा ढोबळे,नंदा लबडे,माजी उपसरपंच श्री.सचिन टाव्हरे,माजी सरपंच मनिषा ढोबळे यांनी केली आहे.
---------------------------------------------
बिबट्याने हल्ला केल्यानंतर रूग्णास प्रतिबंधक लस घ्यावी लागते मात्र हि लस ग्रामीण भागामध्ये उपलब्ध नाही.परिणामी रूग्णास पुण्यासारख्या ठिकाणी न्यावे लागते.त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात मंचर उपजिल्हा रूग्णालयात हि लस उपलब्ध करण्यात यावी.अशी मागणी मुख्याध्यापक रोहिणी ढोबळे यांनी केली आहे.
---------------------------------------------