Pune: पारगावला बिबट्याचा धुमाकूळ; मध्यरात्री पाच मेंढ्यांचा पाडला फडशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2024 17:51 IST2024-04-20T17:50:59+5:302024-04-20T17:51:21+5:30
ही घटना शुक्रवारी (दि. १९ ) मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली ....

Pune: पारगावला बिबट्याचा धुमाकूळ; मध्यरात्री पाच मेंढ्यांचा पाडला फडशा
निरगुडसर (पुणे) : पारगाव (ता. आंबेगाव ) परिसरात बिबट्याने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. येथील लबडे मळ्यात दोन धनगर मेंढपाळांच्या पाच मेंढ्यांचा फडशा बिबट्यांनी पाडला. ही घटना शुक्रवारी (दि. १९ ) मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली .
लबडे मळ्यात भागचंद पोंदे यांच्या शेतात धनगर मथू सदू ढेकळे यांचा वाडा मुक्कामास आहे. वाड्यावर शुक्रवारी मध्यरात्री मेंढ्यावर बिबट्याने हल्ला करून तीन मेंढ्यांचा फडशा पाडला. त्यावेळी मथू ढेकळे यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून पलायन केले. तेथून नजीकच रघू चांगण यांच्या शेतात केरू नाना माने यांच्या शेळ्या, मेंढ्यांच्या वाड्यावर बिबट्याने हल्ला करून दोन मेंढ्यांना जागीच ठार केले.
घटनेची माहिती माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे यांनी वनविभागाला दिली. शुक्रवारी (दि. १९ ) सकाळी वनपाल सोनल भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक साईमाला गित्ते यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला.