Pune | आमदाबादमध्ये तरुणांवर बिबट्याचा हल्ला; दोन्ही तरुण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 14:11 IST2023-01-11T14:08:45+5:302023-01-11T14:11:01+5:30
आमदाबाद, माशेरेमाळा व परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे...

Pune | आमदाबादमध्ये तरुणांवर बिबट्याचा हल्ला; दोन्ही तरुण गंभीर जखमी
टाकळी हाजी (पुणे) : शिरूर तालुक्यातील आमदाबाद येथील शेतात काम करणाऱ्या दोन तरुणांवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात तरुणांनी बिबट्याशी दोन हात करून स्वतःचा जीव वाचवला. ही घटना मंगळवारी (दि. १०) सकाळी ११ वाजता घडली. हल्ल्यातील दोन्ही तरुण जखमी झाले असून, त्यांना शिरूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
विकास रतन जाधव व वैभव मोहन जाधव असे या धाडसी तरुणांची नावे असून त्यांच्या पाठीला, हाताला, कानाला बिबट्याने हल्ला केल्यामुळे जखमा झाल्या आहेत. दरम्यान भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे आमदाबाद, माशेरेमाळा व परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात पिंजरा लावून हल्ला करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.
शिरूर तालुक्यातील अहमदाबाद येथील शेतामध्ये हे तरुण मंगळवारी काम करत होते. यावेळी मक्याच्या शेतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक विकास जाधव याच्यावर हल्ला केला. हा हल्ला होत असताना वैभव जाधव यांनी त्याच्या हातात असणाऱ्या काठीने विकासवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला मारले. आपल्यावर हल्ला करतोय हे पाहताच बिबट्याने विकासला सोडून वैभव जाधव यांच्या पाठीवर हल्ला करून त्याला आपल्या पंजात पकडले आणि चावा घेण्याचा प्रयत्न केला. बिबट्याने वैभव याला जोरात हिसका दिला. याच वेळेस जखमी झालेल्या विकासने बिबट्यावर हल्ला चढवला. यामुळे बिबट्या गांगरून गेला आणि वैभवला सोडून मक्याच्या शेतात पळ काढला. जखमी झालेल्या तरुणांना शिरूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती सरपंच सविता माशेरे यांनी दिली आहे.
सरपंच सविता माशेरे म्हणाल्या की, बिबट्याची दहशत वाढली असून, शेतात काम करायला महिला घाबरू लागल्या आहेत. वनविभागाने या भागात त्वरित पिंजरा लावावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.