दिवळेत घरासमोर झोपलेल्या दोघांवर बिबट्याचा हल्ला ; दोघे गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 02:32 PM2018-04-19T14:32:26+5:302018-04-19T14:32:26+5:30
काही महिन्यांपूर्वी याच गावात तीन बिबटे मृत अवस्थेत सापडले होते. यावेळी हे बिबटे येथे आलेच कसे असा प्रश्न उपस्थित झाला होता. वनविभागानेही या भागात बिबटे असणे अशक्य असेच वर्तवले होते.
नसरापूर : पुणे - सातारा महामार्गालगत असलेल्या दिवळे गावात गुरूवारी रात्री घरासमोर झोपलेल्या दोघांवर बिबट्याने केलेल्या हल्ला केला. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी याच गावात तीन बिबटे मृत अवस्थेत सापडल्याने मोठी खळबळ उडाली होती. किरण गोपाळ पांगारे (वय ३३), सुरेश जगताप (वय ५२, दोघे रा.दिवळे) अशी हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. किरण व सुरेश हे गरमीचे दिवस असल्याने घरासमोर झोपले होते. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास झोपलेले असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी आरडाओरड केल्याने घरातील लोक जागे झाल्याने बिबट्या पसार झाला. या अगोदर बिबट्याकडून गाय, दोन वासरे व म्हैस यांना लक्ष करण्यात आले होते.
या हल्ल्यात किरण याला छाती,पाय व हातावर गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांना भोर येथील उपजिल्हा रूग्णालय व सुरेश याला नसरापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. दोघांनाही पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
काही महिन्यांपूर्वी याच गावात तीन बिबटे मृत अवस्थेत सापडले होते. यावेळी हे बिबटे येथे आलेच कसे असा प्रश्न उपस्थित झाला होता. वनविभागानेही या भागात बिबटे असणे अशक्य असेच वर्तवले होते. मात्र, आजच्या घटनेमुळे आता बिबट्याने भोर तालुक्यातही मुक्काम ठोकल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाला बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरे लावण्याची मागणी केली आहे.
रुग्णालयात कुत्रे चावल्याचे निदान करून टिटचे इंजेक्शन
जखमी अवस्थेत ग्रामस्थांनी किरण यांना भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता त्याचे म्हणणे ऐकून न घेता त्याला कुत्र्याने चावा घेतला असे परस्पर निदान करून त्यास टीटीचे इंजेक्शन देण्यात आले. व पुढील उपचारासाठी ससून येथे जा असे सूचवून त्याला बाकी कुठलेही उपचार केले नाहीत.यामुळे येथील भोंगळ कारभोर पुन्हा एकदा समोर आला आहे.