बिबट्याचा शेतात काम करणाऱ्या युवकावर हल्ला; नशीब बलवत्तर म्हणून वाचला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 20:56 IST2021-06-15T20:53:15+5:302021-06-15T20:56:42+5:30
युवक गंभीर जखमी : घुलेपट येथील घटना

बिबट्याचा शेतात काम करणाऱ्या युवकावर हल्ला; नशीब बलवत्तर म्हणून वाचला जीव
ओतूर : येथील घुलेपट येथे सोमवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास ऊसात दडून बसलेल्या बिबट्याने शेतात काम करणाऱ्या युवकावर पाठीमागून हल्ला करत जखमी केले. त्याने आरडा ओरड केल्याने तसेस बिबट्याला प्रतिकार केल्यामुळे बिबट्या पळाला. जखमी युवकाला ओतूर प्राथमिक रुग्णालयात प्रथोमोपचार करून पिंपरी-चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
निलेश ज्ञानेश्वर घुले (वय ३३, रा.घुलेपट) असे जखमी युवकाचे नाव आहे. घुलेपटात निलेश ज्ञानेश्वर हा शेतात सोयाबीनची पेरणी करण्यासाठी ट्रक्टरच्या सहाय्याने पेरणी पूर्व मशागत कशी झाली हे पाहण्यासाठी आला होता. ट्रक्टर चालक निघून गेला होता. निलेश घुले शेताच्या बांधावर मशागतीची पाहणी करीत असतांना ऊसात दडून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर पाठिमागुन येत हल्ला केला. निलेशच्या दंडाला चावा घेत त्याला ओरखडले. निलेशने आरडाओरडा केला. तसेच बिबट्याला प्रतिकार केला. दरम्यान निलेशच्या आवाजाने आजुबाजुच्या शेतातील लोक आले. त्यांची चाहूल लागताच बिबट्याने बाजुच्या शेतात धूम ठोकली. या घटनेत निलेशला ३२ जखमा झाल्या आहेत.
जखमी निलेशला नागरिकांनी ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सारोक्ते व डॉ. यादव शेखरे यांनी प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नेण्यास सांगितले. वनविभागाचे वनपाल सुधाकर गित्ते, वनपाल रविंद्र गवांदे, सुदाम राडोड, फुलचंद खंडागळे आरोग्य केंद्रात आले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी जुन्नर पंचायत समितीचे सभापती विशाल तांबे उपस्थित होते. त्यांनी निलेशची विचारपूस केली. निलेश यांच्या उपचारासाठी जो खर्च येईल तो खर्च वनविभागाच्या वतीने केला जाणार आहे, अशी माहिती वनपाल सुधाकर गिते यांनी सांगितले.
पिंजरा लावण्याची मागणी
या परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. यामुळे नागरिक दहशतीखाली असून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा. तसेच विद्दुत दिवे लावावे अशी मागणी केली. ओतूर वनविभागाच्या वतीने तातडीने पिंजरा लावण्यात आला आहे. जखमी निलेश ची प्रकृती सुधारत आहे