बिबट्याचा दुचाकी चालकावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:07 AM2021-06-27T04:07:55+5:302021-06-27T04:07:55+5:30
ओतूर : गेल्या आठवड्यात नीलेश घुले या तरुणावर बिबट्याने हल्ला करून त्याला जखमी केले होते. ही ...
ओतूर : गेल्या आठवड्यात नीलेश घुले या तरुणावर बिबट्याने हल्ला करून त्याला जखमी केले होते. ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी (दि. ८) सायंकाळी ८ च्या सुमारास घुलेपट येथे दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणावर हल्ला करत त्याला जखमी केले. या घटनेत दुचाकीवरील तरुण बालंबाल बचावला आहे.
अजित विठ्ठल घुले (रा. घुलेपट, उंब्रज पांध, ओतूर) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. अजित हा त्याच्या घरी जात होता. या वेळी उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्या अंगावर अचानक झेप घेऊन त्याला दुचाकीवरून खाली पाडले. या घटनेत अजित जखमी झाला. या घटनेनंतर आवाज झाल्याने बिबट्या बाजूच्या शेतात पसार झाला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे अजितने घाबरलेल्या अवस्थेत असताना पुन्हा गाडी उचलून जाण्याच्या प्रयत्नात असताना पुन्हा बिबट्या मागून आला. त्याचा आवाज आल्याने अजितने येथील जवळच असलेल्या भारत तांबे यांच्या घराचा आसरा घेतला. तांबे यांनी ही घटना ओतूर वनविभागाला सांगितली. वन कर्मचाऱ्यांनी जखमी अजितवर ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. अजित हा पानसरेवाडी येथून आपल्या घराकडे दुचाकीवरून जात होता. १० दिवसांपूर्वी नीलेश घुले या तरुणावर याच परिसरात बिबट्याने हल्ला करून त्यास गंभीर जखमी केले होते. दोन्ही घटनास्थळामधील अंतर हे सुमारे ७०० मीटर इतके असावे. यामुळे हल्ला करणारा बिबट्या अद्यापही पकडला गेलेला नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिक दहशती खाली आहेत. या परिसरात बिबट्याची नेमकी संख्या किती? हा प्रश्न अनुउत्तरित असून वनरक्षक विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पुन्हा पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रा.पं सदस्य प्रशांत डुंबरे, शेतकरी विकास घुले, विठ्ठल घुले, निलेश घुले, भारत तांबे, दत्तात्रय तांबे, मयूर घुले, रामचंद्र डुंबरे, अमित घुले, विशाल घुले, सचिन डुंबरे,संतोष दुधवडे यांनी केली आहे.
फोटो :