दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याचा हल्ला; पत्नीने हातातील बॅग बिबट्याच्या तोंडावर मारली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 05:35 PM2023-11-16T17:35:29+5:302023-11-16T17:35:51+5:30
पत्नीने बिबटयाच्या तोंडावर बॅग मारली त्याचवेळी मागून येणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीची लाईट चमकल्याने तो पळून गेला
मंचर: वर्षश्राद्ध कार्यक्रमासाठी दुचाकीवरून जाणाऱ्या पती-पत्नीवर व मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री चांडोली गावच्या हद्दीत घडली आहे. या घटनेत भरत गोविंद राऊत हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. महिलेने प्रसंगावधान राखत हातातील बॅग बिबट्याच्या तोंडावर फेकून मारली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सातगाव पठार भागातील पेठ येथून चांडोली खुर्द येथे चुलत भावाच्या वडिलांच्या वर्षश्राद्ध कार्यक्रमाला दुचाकीवरून जात असलेल्या पती-पत्नीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान घडली आहे. या घटनेत भरत गोविंद राऊत (रा. पेठ) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे उपचार सुरू आहेत. मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस व वनपाल शशिकांत मडके यांनी भेट दिली.
भरत गोविंद राऊत (वय ५३), पत्नी रचना भरत राऊत (वय ४३) व मुलगा समर्थ भरत राऊत (वय ११), हे भाऊबीजेचा कार्यक्रम उरकून रात्री ९ वाजता पेठ येथुन चांडोली येथे चुलत भाऊ राहुल रेवजी राऊत यांच्या घरी चुलत्याच्या वर्षश्राद्ध कार्यक्रमाला निघाले होते. रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान ते चांडोली खुर्द फाटा येथे रस्त्याने जात असताना रस्त्याच्या बाजूकडे उसातून अचानक बिबट्याने डरकाळी फोडत त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी बिबट्याने भरत राऊत यांच्या पायावर पंजा मारल्याने ते जखमी झाले आहेत. त्यांनी प्रसंगवधान दाखवत दुचाकी पळवली. परंतु काही वेळ बिबट्याने त्यांचा पाठलाग केला त्यांची पत्नी रचना राऊत दुचाकीच्या मागे बसली होती. तिने प्रसंगावधान दाखवत हातातील बॅग बिबट्याच्या तोंडावर फेकून मारली. त्यामुळे बिबट्या दबकला मात्र तो त्यांचा हळूहळू पाठलाग करत होता. त्याचवेळी रस्त्यावरून मागून येणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीची लाईट चमकल्याने बिबट्या पळून गेला आहे.
भरत राऊत यांनी दुचाकी पळवत पुढे येऊन थांबवली. त्यावेळी त्यांच्या पायातून रक्त पडत होते. त्यांनी त्यांचा भाऊ राहुल राऊत याला फोन करून घटनेची माहिती दिली असता त्यांनी घटनास्थळी येत भरत राऊत यांना उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे उपचारासाठी दाखल केले आहे. रुग्णालय प्रशासनाने याबाबत वनविभागाचे अधिकारी यांना कळवळे आहे. दरम्यान भरत राऊत हे कुटुंबातील कमावती व्यक्ती असून वनविभागाचे अधिकारी यांनी योग्य तो पाठपुरावा करून त्यांना मदत मिळवून द्यावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.