मावळात पवना टेंट कॅम्पिंग परिसरात बिबट्या; दोन ते तीन ग्रामस्थांवर हल्ला, पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 10:36 IST2025-03-07T10:35:37+5:302025-03-07T10:36:07+5:30
पवना कॅम्पिंग साईटवर येथे उंबराच्या झाडावर बसलेल्या बिबट्याला पकडण्यात यश आले आहे

मावळात पवना टेंट कॅम्पिंग परिसरात बिबट्या; दोन ते तीन ग्रामस्थांवर हल्ला, पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण
पवनानगर: पवनाधरण परिसरातील आंबेगाव येथील पवना कॅम्पिंग साईटवर येथे उंबराच्या झाडावर बसलेल्या बिबट्याला पकडण्यात यश आले आहे. या बिबट्याच्या हल्ल्यात दोन ते तीन ग्रामस्थ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या बाजूला असलेल्या आंबेगाव येथील टेंट कॅम्पिंग साईट येथे आज (दि.७.शुक्रवार) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बिबट्या एका उंबराच्या झाडावर बसलेला आढळून आला. त्यापूर्वी त्या बिबट्याने शिंदगाव येथे केलेल्या हल्ल्यात दोन ग्रामस्थ जखमी झाले आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती.पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. बाळू शिंदे (रा. शिंदगाव, ता. मावळ) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर आणखी दोन ग्रामस्थांना जखमी केले आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि पोलिसांना कळविण्यात आले होते, घटनास्थळी तातडीने पथक रवाना झाले होते. बिबट्या पवनाधरण परिसरातील आंबेगाव येथील एका पवना टेंट कँपिंग च्या जवळपास असलेल्या उंबराच्या झाडावरच बसलेला होता. ग्रामस्थ व वनविभागाने कसरत करत बिबट्याला पकडला.
मावळ परिसर पर्यटनासाठी प्रसिद्ध असल्याने येथे नेहमीच पर्यटकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे बिबट्याच्या उपस्थितीमुळे पर्यटक आणि स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे असे आवाहन केले आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बिबट्याला कोणतीही इजा होऊ नये म्हणून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्याला जंगलात सुखरूप परत पाठवण्यासाठी प्रशिक्षित पथक कार्यरत होते. दरम्यान, बिबट्याच्या उपस्थितीमुळे कॅम्पिंग साईटवरील काही पर्यटकांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला होता. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून आहे. तर बिबट्याला जंगलात सोडवण्यासाठी पथक रवाना झाले आहे.