इंदापूर तालुक्यात बिबट्याचा महिलेवर हल्ला; दैव बलवत्तर म्हणून वाचला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 08:43 PM2021-06-11T20:43:08+5:302021-06-11T20:43:53+5:30
इंदापूर वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पिंजरे लावण्यास विलंब होत असल्याने परिसरातील नागरिक आक्रमक झाले आहेत.
बाभुळगाव: इंदापूर तालुक्यातील पडस्थळ परिसरातील झेंडे वस्तीजवळ बिबट्याने शेतकर्याची दोन पाळीव कुत्री पळवुन नेल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी ( दि.१०) सायंकाळी महिलेवर त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु, दैव बलवत्तर असल्याने ही महिलाबिबट्याच्या तावडीतुन सुखरूप बचावली.
झेंडेवस्ती या ठिकाणी सुमारे ८० पेक्षा जास्त लोकांचे वास्तव्य आहे. तसेच येथील शेतकर्यांकडे मोठ्या प्रमाणात शेळी, मेंढी, गाय, बैल, म्हैस यांसह इतर पशुधन आहे. त्यामुळे परिसरात बिबट्याचे हल्ले होत असल्याने नागरीक व पशुधनाचा जीव धोक्यात आहे बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी पडस्थळ ग्रामस्थांनी इंदापूर वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. परंतु काळे हे या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहेत.
इंदापूर वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पिंजरे लावुन बिबट्याचा बंदोबस्त करण्यास विलंब होत असल्याने परिसरातील नागरिक आक्रमक झाले आहेत. नागरिक व पशुधनाच्या जीविताशी खेळणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे,