शिरूर- भीमाशंकर महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 01:19 PM2021-01-28T13:19:56+5:302021-01-28T13:31:04+5:30
अज्ञात वाहनाने ३ महिन्याच्या बछड्याला धडक दिल्याने डोक्याला जबर मार लागुन बछडा जागीच ठार झाला.
राजगुरुनगर: खेड तालुक्यातील पश्चिम भागातील तनपुरे वस्ती (ता. खेड ) येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन महिन्याचा मादी जातीचा बछडा ठार झाल्याची घटना घडली आहे.
शिरूर -भिमाशंकर या राज्य महामार्गावर बुरसे वाडीलगत तनपुरे वस्ती येथे अज्ञात वाहनाने ३ महिन्याच्या बछड्याला धडक दिल्याने डोक्याला जबर मार लागुन बछडा जागीच ठार झाला. हि घटना आज (दि २८ ) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. ही घटना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना कळतात घटनास्थळी धाव घेतली. हा मादी जातीचा बछडा आहे. त्यांचे वजन ६ किलो आहे. घटनास्थळी वन परिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन, वनपाल प्रदीप कासारे, एन .डी विधाटे, आर एस, गोकुळे, एस.आर.राठोड ,सीमा सपकाळ यांनी भेट दिली. तसेच खरपुडी (ता खेड ) येथे रोपवाटिकामध्ये मृत बछड्याचे अग्नी दहन करण्यात आले. डोंगरदऱ्यातून पाणी पिण्यासाठी हा बछडा चासकमान धरण परिक्षेत्रात येत असताना रस्ता ओलांडताना अपघात झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.