: विहिरीत पडल्याने बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:10 AM2021-03-19T04:10:37+5:302021-03-19T04:10:37+5:30
आंबेगाव तालुक्यात बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे. तसेच बिबट्यांचे पशुधनावर होणारे हल्ले हे दररोजचेच झाले आहे. मागील वर्षी 25 ...
आंबेगाव तालुक्यात बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे. तसेच बिबट्यांचे पशुधनावर होणारे हल्ले हे दररोजचेच झाले आहे. मागील वर्षी 25 एप्रिल रोजी शिंगवे परिसरातील पूर्व भागात असणाऱ्या माळीमळा येथे तीन वर्षे वयाच्या नर जातीच्या बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता. आज 11 महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा याच परिसरात बिबट्याच्या बछड्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शिंगवे गावच्या पश्चिमेला नदीकाठी असणा-या सावतामाळी मळा (वरदेमळा) परिसरात असणाऱ्या जालिंदर आरोटे यांच्या विहिरीत आज दुपारी एकच्या दरम्यान बिबट्या पडला असल्याचे निदर्शनास आले. ही माहिती पोलीस पाटील गणेश पंडित यांनी तत्काळ वन विभागाशी संपर्क करून कळविली. वनविभागाचे वनपाल विजय वेलकर, वनरक्षक एस. एस. दहातोंडे, वनसेवक एस. बी. भोर, व बिबट्या रेस्क्यू टीमचे नागापूर, वळतीचे सदस्य यांनी विहिरीतील पाण्यावर तरंगणाऱ्या बिबट्याला विहिरीतून बाहेर काढले. शवविच्छेदन करण्यासाठी वळती येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले आहे. सदर बिबट्या नर जातीचा असून सात ते आठ महिन्यांचा असल्याचे डॉ. कड यांनी सांगितले. या बिबट्याच्या बछड्याचे शवविच्छेदन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश कड यांनी केले असून बछड्याचे अग्नी दहन करण्यात येणार असल्याचे विजय वेलकर यांनी सांगितले.