विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला काढले बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:09 AM2021-04-14T04:09:39+5:302021-04-14T04:09:39+5:30
जुन्नर तालुका हा बिबट्याप्रणव क्षेत्र असलेला तालुका असून तालुक्यात बिबट्यांची संख्या मोठी आहे. सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू असल्यामुळे ...
जुन्नर तालुका हा बिबट्याप्रणव क्षेत्र असलेला तालुका असून तालुक्यात बिबट्यांची संख्या मोठी आहे. सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू असल्यामुळे बिबट्यांना निवारा मिळत नाही. त्यामुळे बिबटे सैरभैर होत आहेत. तालुक्यात बिबटे विहिरीत पडण्याच्या घटना तालुक्यात कायमच घडत आहेत. पिंपरी पेंढार येथील नवलेवाडी शिवारातील शेतकरी रभाजी पवार हे आज सकाळी दहाच्या सुमारास विहिरीजवळ गेले असता त्यांना विहिरीत बिबट्याचा बछडा पडला असल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती त्यांनी तत्काळ वनविभागाला दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनखात्याचे वनपरीक्षेत्र अधिकारी योगेश घोडके, वनपाल एस. के. साळूंके, वनरक्षक व्ही. टी. विभुते, वनसेवक बी. के. खर्गे ,वनखात्याचे कर्मचारी तसेच रेस्क्यू टीमचे बाबाजी खर्गे, दीपक माळी, आकाश माळी, वसंत जाधव यांनी या बिबट्याच्या बछड्याला तत्काळ विहिरीच्या बाहेर काढले. त्यानंतर माणिकडोह बिबट्या निवारण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. निखिल बनगर यांनी या बिबट्याच्या बछड्याची तपासणी केली असून त्यास माणिकडोह येथील बिबट्या निवारण केंद्रात हलविण्यात आले आहे.