राजगुरूनगर परिसरात बिबट्याचे बछडे आढळले मृतावस्थेत; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 01:02 PM2020-11-06T13:02:26+5:302020-11-06T13:28:22+5:30
कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये हे बछडे मृत झाले असून त्याच्या शरीरावर फाडल्याच्या आणि ओरबाडल्याच्या जखमा आढळून आल्या आहेत.
राजगुरुनगर : राजगुरुनगर शहराजवळ असलेल्या सातकरस्थळ येथे सहा ते आठ महिन्याचे बिबट्याचे बछडे शेतात शुक्रवारी (दि. ६ ) सकाळी मृतावस्थेत आढळून आले आहे. या परिसरात काही दिवसापासून बिबट्याचे दर्शन होत असल्याचे नागरिकांनी सांगितले होते. हे अखेर खरे ठरले आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये अधिकच घबराट पसरली आहे. नागरिकांच्या जीवाला धोका असताना वनखात्याचे मात्र दुर्लक्ष असून अद्यापही बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावलेला नाही.
सातकर स्थळ (पश्चिम ) येथे गेल्या काही दिवसापासून बिबट्या या परिसरात वावरत असल्याचे शेतकरी व नागरिक यांच्या निदर्शनास आले होते. तसेच तिन्हेवाडी -सांडभोरवाडी (ता खेड ) या परिसरात काही दिवसापुर्वी बिबट्याने हल्ला करून एका कालवडीचा फडशा पाडला होता. तिन्हेवाडी -सांडभोरवाडी व सातकर स्थळ हा परिसर लगतच आहे. सातकर स्थळ येथे चार दिवसापुर्वी बिबट्या नागरिक व शेतकऱ्यांच्या निर्दशनास आला होता. या ठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. खेड वनविभाग मार्फत आज (दि ६ रोजी ) १० वाजता बिबटयाचा वावर असणाऱ्या पारिसरात पिंजरा बसविण्यात येणार होता. मात्र सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सातकरस्थळ ( पश्चिम ) येथील शेतकरी नाना नवले यांच्या घराजवळील मक्याच्या शेतामध्ये बिबट्याचे नर जातीचे, सुमारे ६ ते ८ महिने वयाचे बछडे मृतावस्थेत आढळून आले आहे.त्यामुळे या परिसरात बिबट्याचे कुटुंब वावरत असल्याचा संशय खरा ठरला असून नागरिकांमध्ये अधिकच घबराट पसरली आहे. नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.मात्र यापुर्वी वनखात्याने याची कोणतीही दखल घेतली नाही.वन परिक्षेत्र अधिकारी आशुतोष शेंडगे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन मृत बछडे ताब्यात घेतले व पंचनामा केला.हे बछडे मृतावस्थेत आढळल्यानंतर त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये हे पिल्लू बछडे झाले आहे. त्याच्या शरीरावर फाडल्याच्या आणि ओरबाडल्याच्या जखमा आढळून आल्या आहेत असे बछड्याचे शवविच्छेद केल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी आशुतोष शेंडगेे यांनी सांगितले. काल गुरुवारी रात्री सातकरस्थळ ( पश्चिम ) येथील पाचारणे वस्तीकडे जाणाऱ्या छोट्या रस्त्यावर, दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणावर बिबट्याने उडी घेतली होती. मात्र उडी चुकल्याने हा तरुण बचावला. बिबट्याची मादी आणि दोन बछडे या परिसरात वावरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या तरुणावर झेप घेणारा बिबट्या म्हणजे ही मादीच असावी, असा या भागातील लोकांचा संशय आहे. आतातरी प्रशासनाने या भागात पिंजरा लावावा, अशी मागणी माजी उपसरपंच राजेंद्र थिगळे यांनी केली आहे .