सावजाचा पाठलाग करत असताना बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू; आंबेगाव तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 07:42 PM2020-04-27T19:42:47+5:302020-04-27T19:43:31+5:30
शेतातील विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू
मंचर : सावजाचा पाठलाग करत असताना एका बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना शिंगवे (ता. आंबेगाव) येथे घडली. तीन वर्षाच्या या बिबट्याचे शवविच्छेदन करून त्याचे अग्नी दहन करण्यात आले.
याबाबत माहिती देताना वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन म्हणाले. आंबेगाव तालुक्यातील शिंगवे येथील सुदाम वाव्हळ, देवराम वाव्हळ यांच्या शेतातील विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी उघडकीस आली. देवराम वाव्हळ हे आपल्या शेतातील कृषीपंप चालू करण्यासाठी सकाळी गेले असताना त्यांना विहिरीत मृतावस्थेतील बिबट्या दिसला. त्यांनी तात्काळ ही माहिती ग्रामपंचायत सदस्य नितीन वाव्हळ यांना दिली. वाव्हळ यांनी सदर घटनेची माहिती वन खात्याच्या अधिका-यांना दिली. सावजाचा पाठलाग करत असताना बिबट्या विहिरीत पडला असावा असा अंदाज वनविभागाचे वनपाल विजय वेलकर यांनी व्यक्त केला आहे.
वनपाल विजय वेलकर, वनरक्षक एस एस दहातोंडे तसेच वन कर्मचा-यांनी दोरी, जाळीच्या साह्याने मृत बिबट्याला बाहेर काढले. पशुवैद्यकीय अधिकारी एस.डी. कड यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले. त्यानंतर या बिबट्याचा अवसरी घाट रोपवाटिका येथे अग्नी दहन करण्यात आले.