Pune News: पुणे-नाशिक महामार्गावर बिबट्याचा मृत्यू; अज्ञात वाहनाची धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 12:03 PM2024-03-23T12:03:44+5:302024-03-23T12:04:03+5:30
अनेकदा बिबटे रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना वाहनांच्या धडकेत गतप्राण होण्याच्या घटना घडताहेत...
आळेफाटा (पुणे) : आळेफाट्याला लागून जाणाऱ्या नव्या बायपासवर भक्षाच्या शोधात रस्तावर आलेल्या बिबट्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी २२ मार्च रात्री १० वाजताच्या सुमारास घडला. पुणे-नाशिक महामार्गावरील जुन्नर तालुक्यात बिबट्यांचा वावर नेहमीच आढळून येतो. सदरचा परिसर उसाचे क्षेत्र अधिक असल्याने बिबट्यांचा नैसर्गिक अधिवास मानला जातो. त्यामुळे अनेकदा बिबटे रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना वाहनांच्या धडकेत गतप्राण होण्याच्या घटना घडताहेत.
शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास शुभम तारांगण सोसायटीच्या जवळ बिबटया रस्ता ओलांडत होता. त्याचवेळी नाशिकच्या दिशेने जाणा-या भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यु झाला. यानंतर मृत बिबट्याला पाहण्यासाठी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी गर्दी केली.
येथील स्थानिकांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी वन विभागाला अपघाताबद्दल माहिती दिली. सदरची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बिबटयाच्या मृतदेहाचा पंचनामा करून मृत बिबट्या ताब्यात घेतला. बिबट्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर माणिकडोह येथे मृतदेहाचे दहन करण्यात येणार असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान आजवर अनेक वन्यप्राण्यांना पुणे-नाशिक महामार्गावर आपला प्राण गमवावा लागला असून मुक्तसंचार करणंही त्यांच्या जीवावर बेतत असल्याचे दिसत आहे.