भीमाशंकर अभयारण्यातून बिबट्या बेपत्ता, जंगल सोडून ऊस शेतीकडे; सांबरांची संख्या वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 04:32 PM2022-05-18T16:32:21+5:302022-05-18T17:41:26+5:30
भीमाशंकरच्या जंगलात भेकर व सांबर जास्त, बिबट्याचे नाही अस्तित्व...
भीमाशंकर :भीमाशंकर अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेच्या रात्री सर्व ठिकाणी भेकर व सांबर पाहायला मिळाले. मात्र कोठेही बिबट्याचे अस्तित्व व खुणा आढळल्या नाहीत. बिबट्या हा जंगलातला प्राणी मात्र बागायती भागात अन्न, पाणी व निवारा मिळू लागल्याने हा प्राणी जंगल सोडून उसाच्या शेतीकडे वळला. त्यामुळे भीमाशंकर जंगलात त्याचे अस्तित्व राहिले नाही. भीमाशंकर अभयारण्य शेकरूसाठी प्रसिद्ध आहे. त्यांची गणना वेगळ्या पद्धतीने जून महिन्यात केली जाणार असल्याचे वनक्षेत्रपाल वसंत चव्हाण यांनी सांगितले.
बुद्ध पौर्णिमेच्या रात्री आठ पाणवठ्यांच्या ठिकाणी हौशी निसर्गप्रेमी व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाणी पिण्यासाठी येणाऱ्या प्राण्यांची पाहणी व निरीक्षण केले. दि. १६ व १७ मे रोजी वन विभागाने पनस्थळांवरील प्राणी पाहणे व निसर्ग अनुभव कार्यक्रम घेतला. यामध्ये २० वनकर्मचारी बरोबर २५ निसर्गप्रेमींनी सहभाग घेतला. उन्हाळ्यात जंगलात पाणी कमी ठिकाणी शिल्लक राहते व पौर्णिमेच्या प्रकाशात पाणवठ्यावर येणारे प्राणी स्पष्ट दिसतात म्हणून हा प्राणी निरीक्षण कार्यक्रम आयोजित केला जातो.
भीमाशंकर जंगलातील चौरा, वीरतले, भाकादेवी, वाजेवाडी, घाटघर, उघडी कलमजाई, करवीचादरा या ठिकाणी असलेल्या त्यांच्या जागी मचाण तयार करून हे निरीक्षण करण्यात आले. यामध्ये तेरा सांबर व सात भेकर तसेच काळा तोंडाची वानरे, मोर, ससे, रानकोंबडे, उदमांजर खवले मांजर, शेकरू आढळून आले. मात्र कोठेही बिबट्याचे अस्तित्व व खुणा आढळल्या नाहीत. बिबट्या हा जंगलातला प्राणी मात्र बागायती भागात अन्न, पाणी व निवारा मिळू लागल्याने हा प्राणी जंगल सोडून उसाच्या शेतीकडे वळला. त्यामुळे भीमाशंकर जंगलात त्याचे अस्तित्व राहिले नाही.
वनविभागाने अतिशय छान उपक्रम राबवला त्यांच्या सहकार्यामुळे जंगलाचा अनुभव घेता आला व जंगली प्राण्यांना जवळून पाहण्याची संधी मिळाली. मचाणावर एक रात्र घालवायचा अनुभव अविस्मरणीय होता, असे सुखदा अगरकर, प्रशांत वाघमारे, मनीषा वाघमारे यांनी सांगितले.
भीमाशंकर जंगलातील वीरतळे, घाटघर, चौरा या ठिकाणी भेकार व सांबर मोठ्या संख्येने दिसले. तसेच इतर ठिकाणीही त्यांचे अस्तित्व आढळून आले. एकंदरीत एक रात्र राबवलेल्या या उपक्रमात भीमाशंकरमध्ये भेकर सांबर यांची संख्या समाधानकारक असल्याचे आढळून आले आहे. भीमाशंकर अभयारण्य शेकरूसाठी प्रसिद्ध आहे त्यांची गणना वेगळ्या पद्धतीने जून महिन्यात केली जाणार असल्याचे वनक्षेत्रपाल तुषार चव्हाण यांनी सांगितले.