जुन्नर तालुक्यात सावज पकडण्याच्या नादात बिबट्या विहिरीत पडला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 03:23 PM2018-10-15T15:23:19+5:302018-10-15T15:25:27+5:30
पिंपळझाप शिवारात सावज पकडण्याच्या नादात एक बिबट्या सोमवारी (दि.१५ आॅक्टो) विहिरीत पडला. भुलीचे इंजेक्शन (डार्ट) देऊन बेशुध्द केल्यावर बिबट्याला बाहेर काढण्यात आले.
जुन्नर : गुळूंचवाडी(ता.जुन्नर)येथील पिंपळझाप शिवारात सावज पकडण्याच्या नादात एक बिबट्या सोमवारी (दि.१५ आॅक्टो) विहिरीत पडला. कपारीत लपुन बसलेल्या बिबट्याला वनखात्याचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी भुलीचे इंजेक्शन मारुन अखेर पिंज-यात जेरबंद करत विहिरीतून बाहेर काढले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळझाप शिवारातील तुकाराम दगडु औटी यांची सामुहिक विहीर आहे. सोमवारी सकाळी तुकाराम औटी मोटार चालु करण्यासाठी गेले असता त्यांनी विहिरीत डोकावले. त्यावेळी त्यांना पाईपाला धरुन बसलेला बिबट्या दिसला. त्यांनी या घटनेची माहिती उपसरपंच बाबाजी एरंडे यांच्यासह काही महत्वाच्या व्यक्तींना दिली. तत्काळ या मंडळींनी बिबट्या विहिरीत पडला असल्याचे वनखात्याच्या कर्मचा-यांना कळविले. त्यानंतर वनरक्षक डी.डी.फापाळे,वनमजुर जे.टी.भंडलकर,बी.सी.येळे,बी.एस.शेळके हे घटनास्थळी दाखल झाले. या विहिरीलाच लागुन दुसरी अरुंद विहीर आहे. त्या विहिरीला मोठे भुयार आहे. बिबट्या या भुयारामार्गे दुस-या अरुंद विहिरीतील असणाऱ्या मोठ मोठ्या कपारीत जावून लपला. त्यामुळे विहिरीत असूनही बिबट्या दिसत नव्हता. वनखात्याचे पशुवैद्यकीय य अधिकारी व कर्मचा-यांनी त्याला पाहण्यासाठी विहिरीत कॅमेरा सोडला. त्यानंतर हॅलोजनचे लाईट लावुन पाहिले तसेच फटाके दोरीला बांधुन विहिरीत फोडले तरीही त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यानंतर वनखात्याच्या कर्मचा-यांनी ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत पिंजरा सोडला तरीही त्यामध्ये बिबट्या आला नाही. शेवटी या अरुंद विहिरीतील बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देऊन वर काढण्याचा निर्णय माणिकडोह बिबट्या निवारा केंद्राच्या अधिका-यांनी घेतला.यावेळी पिंज-यात बसुन डॉ.अजय देशमुख व डॉ.महेंद्र ढोले हे विहिरीत उतरले. त्यांना विहिरीच्या कपारीत बिबट्या लपलेला दिसला.त्यांनी त्या बिबट्याला भुलीचे इंजेक्शन (डार्ट) देऊन बेशुध्द केले. त्यानंतर लगेच थोड्या वेळाने बिबट्या बेशुध्द झाल्यानंतर त्याला लगेचच पाण्यातुन बाहेर काढुन पिंज-यात जेरबंद करुन वर काढले. याठिकाणी जवळपास पाच तास हे रेस्क्यु टिमचे प्रयत्न चालु होते. पकडलेल्या बिबट्याला माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रात हलविले आहे.