जरेवाडीत विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका करून केले जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 04:39 PM2022-02-28T16:39:24+5:302022-02-28T16:43:09+5:30
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी जुन्नर येथून पिंजरा मागवण्यात आला...
राजगुरूनगर: जरेवाडी ( ता. खेड ) येथे विहिरित पडलेल्या बिबट्याला वन विभाग व तरुणांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. जरेवाडी येथील शेतकरी नाथा बबन जरे यांच्या विहिरीत सोमवारी (दि. २८ ) बिबट्या पडल्याचा प्रकार घडला. शेतकरी नाथा जरे हे विहिरीतील पाणी पाहण्यासाठी गेले असता. यावेळी विहिरीच्या दगडावर बिबट्या असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
खेड वन खात्याला या घटनेची कल्पना दिल्यानंतर या बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यासाठी व जेरबंद करण्यासाठी वन खात्याची टीम घटनास्थळी दाखल झाली. बिबट्या विहिरीत पडल्याचे वृत्त गावात पसरताच ग्रामस्थांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी जुन्नर येथून पिंजरा मागवण्यात आला.
खेड तालुक्यातील जीवसृष्टी संरक्षण सामाजिक संस्था, खेड वन विभाग तसेच गावातील तरुणांच्या मदतीने विहिरीत दोरीच्या सह्याने पिंजरा सोडून बिबट्याला एक तासाच्या प्रयत्नाने अलगद बाहेर काढण्यात यश आले.
यावेळी वनपरीक्षेत्र अधिकारी प्रदिप रौंधळ,वनक्षेत्ररक्षक एम.जी. वाघुले, पी.एस.कासारे, डी.डी.फापाळे, जी.वाय. कुलकर्णी,वन कर्मचारी ए.आर. गुटटे,एस.के.ढोले.एस.एन. वडजे, के.एस.पवार, कैलास काळे,आर.डी.सातकर, हिरामण आडवळे, अशोक वरुडे, जरेवाडीचे सरपंच अंकुश जरे यांच्यासह गावातील तरुण यावेळी उपस्थित होते.