बिबट्याची मादी जेरबंद
By admin | Published: April 18, 2016 02:55 AM2016-04-18T02:55:12+5:302016-04-18T02:55:12+5:30
मंगरुळ (ता. जुन्नर) येथील आंबेविहीर परिसरात वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्याची मादी आज (दि. १७) पहाटेच्या सुमारास जेरबंद झाली.
बेल्हा : मंगरुळ (ता. जुन्नर) येथील आंबेविहीर परिसरात वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्याची मादी आज (दि. १७) पहाटेच्या सुमारास जेरबंद झाली.
आंबेविहीर परिसरात बिबट्याचे वास्तव्य काही दिवसांपासून आहे. ह्या भागातील लोकांना बिबट्याचे केव्हाही दर्शन होत होते. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. लहान मुलांना ग्रामस्थ स्वत:ची कामे बाजूला ठेवून गाडीवर शाळेला सोडत आहेत.
बिबट्याची दहशतच या
भागात मोठ्या प्रमाणावर आहे. या परिसरात दि. ११ फेब्रुवारी २०१६ रोजी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात कविता कुंभार (वय ३२) या जखमी झाल्या होत्या. त्यानंतर वनखात्याने या परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावले होते.
बिबट्याचे आंबेविहीर परिसरातील कुत्रे, रानडुकरे तसेच पाळीव जनावरांवर हल्ले चालूच होते. पिंजरे लावूनही त्यात बिबट्याच येत नव्हता. वनखात्याचे कर्मचारीही हतबल झाले होते.
वनखात्याने संजय चिमाजी लामखडे यांच्या शेतात पिंजरा लावला होता. मात्र तब्बल दोन महिन्यांनंतर बिबट्या पिंजऱ्यात अडकला. हा मादी जातीचा बिबट्या असून पूर्ण
वाढ झालेला बिबट्या आहे.
ह्या बिबट्याला वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी माणिकडोह निवारा केंद्रात हलविले.
(वार्ताहर)
शनिवारी (दि. १६) शेतामध्ये जनावरांसाठी चारा कापणाऱ्या खराडेमळा येथील सगुणाबाई दादाभाऊ खराडे (वय ५५) ह्या महिलेवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घालून तिला उसाच्या शेतात ओढत नेऊन तिला जागेवरच ठार केले. त्याच्या पार्श्वभूमीवर वनखात्याने ह्या भागात सहा पिंजरे बिबट्याला पकडण्यासाठी लावले आहेत. अजूनही ह्या भागात पिंजऱ्यांची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे वनखात्याकडून सांगण्यात आले.