अखेर बिबट्या २४ तासाच्या आत जेरबंद; पुण्यात काल मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या व्यक्तीवर केला होत हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 10:44 AM2021-10-27T10:44:26+5:302021-10-27T10:50:02+5:30
दिवसभर शोध घेऊन रात्री साडेदहा वाजता त्याला जेरबंद करण्यात यश आले आहे
हडपसर : हडपसर येथील साडेसतरानळी गोसावी वस्ती परिसरात मंगळवारी पहाटे एका तरुणावर बिबट्याने हल्ला केला होता. त्यानंतर हा बिबट्या तेथेच दबा धरून बसला होता. दिवसभर शोध घेऊन रात्री साडेदहा वाजता त्याला जेरबंद करण्यात यश आले आहे. त्या बिबट्याला कात्रज उद्यानात सोडून देण्यात आले आहे.
तरुणावर हल्ला केल्यावर रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळावरुन काही मीटर अंतरावरच भरवस्तीत दोन घरांच्या बोळीमध्ये बिबट्याचा वावर असल्याचे येथील नागरिकांना दिसले. सावध नागरिकांनी तात्काळ पोलिसांना व वनविभागाला कळवले. येथील वस्तीमध्ये राहणारे सचिन आटोळे व विश्वास गायकवाड यांच्या घरामध्ये असलेल्या बाेळीत हा बिबट्या आढळून आला.
पुण्यात मॉर्निंग वॉकला चाललेल्या तरुणावर बिबट्याचा हल्ला
बिबट्या काहीसा जखमी अवस्थेत असल्यामुळे तो तेथे थंडपणे बसलेला होता. नागरिकांची चाहूल लागताच त्याने गुरगुरणे सुरू केले. वनविभागाच्या अधिकारी कर्मचारी व रेस्क्यू टीमने दाट गनच्या साहाय्याने बिबट्यास बेशुद्ध केले. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास बिबट्यास जेरबंद करण्यास यश मिळाले. हल्ल्याला प्रतिकार केल्यावर बिबट्या जवळच्या गवताळ भागात निघून गेला होता. या बिबट्याबरोबर झालेल्या झटापटीत एक जण जखमी झाला आहे. वन विभागाचे बिबट्याला पकडण्याचे हे ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर बिबटयाला वनविभागाच्या रेस्क्यू टीमने बिबट्यास कात्रज सर्प उद्यान येथे पुढील उपचारासाठी दाखल केले आहे.