बिबट्याने केला दुचाकीचा पाठलाग; बालिका जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 08:14 PM2019-04-29T20:14:18+5:302019-04-29T20:15:29+5:30
पिंपळवंडी स्टँड ते भटकळवाडी रस्त्यावर दुचाकीवरून जाणाऱ्या एका कुटुंबीयाच्या मागे बिबट्या लागला.
पिंपरी पेंढार : पिंपळवंडी स्टँड ते भटकळवाडी रस्त्यावर दुचाकीवरून जाणाऱ्या एका कुटुंबीयाच्या मागे बिबट्या लागला. त्याने दुचाकीवर झडप घातली. त्यात दुचाकीच्या पाठीमागे ब सलेली मुलगी किरकोळ जखमी झाली. ही घटना रविवारी रात्री नऊच्या सुमारास घडली.
प्रमाणील दिनेश थोरात (वय ९ वर्षे)असे जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी पिंपळवंडी गावची यात्रा असल्याने काकडेमळा येथील ग्रामपंचायत सदस्य सतिष काकडे हे प्रणाली दिनेश थोरात व अथर्व काकडे यांच्या सोबत रात्री नऊच्या सुमारास दोन दुचाकीवर आपल्या घरी जात होते. त्यावेळी कॅनॉलच्या रस्त्या जवळच बिबट्याची तीन पिल्ले व मादी खेळत होती.
अथर्व काकडे व प्रणाली थोरात(वय९) हे ज्या दुचाकीवर बसले होते. त्या दुचाकीचा पाठलाग बिबट्या मादीने केला व दुचाकीवर झडप मारली. यात प्रणाली थोरात हिच्या हाताच्या बोटाला बिबटच नख लागले व त्यात ती जखमी झाली. त्यानंतर दहा वाजण्याच्या सुमारास अक्षय वाव्हळ व त्यांचे मित्र हे त्याच मार्गाने जात असताना त्यांच्या दुचाकीचाही बिबट्याने पाठलाग केला. या रस्त्यावर बिबट्याने दुचाकींचा पाठलाग करण्याच्या घटना वाढल्या आहेत. भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडु नये म्हणुन वनविभागाने लवकरच या परिसरात पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सतिष काकडे आणि स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.