माळेगावमध्ये आढळले बिबट्याच्या पावलाचे ठसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:10 AM2021-04-04T04:10:21+5:302021-04-04T04:10:21+5:30
माळेगाव खुर्द ता. बारामती येथे नीरा डाव्या कॅनॉलवरुन जाणा-या पाइपलाइनवर बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत. तर संध्याकाळी साडेआठ ...
माळेगाव खुर्द ता. बारामती येथे नीरा डाव्या कॅनॉलवरुन जाणा-या पाइपलाइनवर बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत. तर संध्याकाळी साडेआठ वाजता बिबट्या प्रत्यक्ष पाहिल्याचे एका व्यक्तीचे म्हणणे आहे. सदर बिबट्या आढळून आल्याचे उद्योजक अमर काटे यांनी वनाधिकारी व पोलिसांना कळविले. अखेर वनपरीक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांच्या सूचनेनुसार वनपाल पी. डी. चौधरी, वनरक्षक अनिल माने, मनीषा गुरव, वनमजूर सुभाष पानसांडे, प्रकाश लोंढे यांनी घटनास्थळी भेट दिली.
यावेळी माळेगाव पोलीस दूरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक महेश विधाते यांच्यासह पोलीस हवालदार आबा ताकवणे, योगेश चितारे, निखिल जाधव, दीपक दराडे आदी पोलीस कर्मचारी दाखल झाले. यावेळी बिबट्या आढळून आलेल्या परिसराची कसून तपासणी केले असता पाईपलाईनवर काही ठसे उमटलेले दिसले. या ठशांची पाहणी केली असता ते ठसे बिबट्याचे असल्याचे आढळून आले. लगेचच वन कर्मचारी व पोलिसांनी सर्व परिसर पिंजून काढला.
बिबट्या दिसल्याची माहिती लोकांना सोशल मीडियावरून मिळाल्याने सर्व सतर्क झाले. रात्री दोन वाजेपर्यंत बिबट्याची शोध मोहीम सुरु होती. मात्र बिबट्याचा तपास लागला नाही. दरम्यान बिबट्या आढळून आल्याने माळेगाव बु., माळेगाव खुर्द, मेडद आदी गावात घबराट उडाली आहे. ज्या भागात बिबट्या दिसला या ठिकाणी ऊस शेती व लोकवस्ती देखील आहे. त्यामुळे शेतकरी शेतात जायला घाबरत आहे. तर शेतमजूर देखील भीतीपोटी कामाला जाण्यास तयार नाही.
माळेगाव खुर्द येथे बिबट्या आढळून आला आहे. सदरचा बिबट्या काटेवाडीतून आला असण्याची शक्यता आहे. तसेच तो एका जागेवर थांबत नाही. त्या बिबट्याने जनावरांवरती अथवा मनुष्यावर हल्ला केला नाही. त्यामुळे त्यास पकडण्यासाठी पिंजरा लावता येत नाही. बिबट्या दिसल्यास फटाके वाजवावेत, एकट्याने घराबाहेर अथवा शेतात जाऊ नये. सर्वांनी सतर्कता बाळगून काळजी घ्यावी.
- राहुल काळे
वनपरीक्षेत्र अधिकारी