राजगुरुनगर शहर परिसरात घराच्या अंगणात बिबट्याचा वावर; कुत्र्याला जबड्यात पकडले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 04:18 PM2023-08-08T16:18:17+5:302023-08-08T16:18:36+5:30

शहर परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकात घबराटीचे वातावरण

Leopard in the courtyard of a house in Rajgurunagar city area; Caught the dog in the jaws | राजगुरुनगर शहर परिसरात घराच्या अंगणात बिबट्याचा वावर; कुत्र्याला जबड्यात पकडले

राजगुरुनगर शहर परिसरात घराच्या अंगणात बिबट्याचा वावर; कुत्र्याला जबड्यात पकडले

googlenewsNext

राजगुरुनगर : शहराच्या वाडा रोड परिसरात मंगळवारी (दि. ८) पहाटे बिबट्याने धुमाकूळ घातला. शहर लगतच्या सातकर स्थळ ग्रामपंचायत हद्दीतील वाडा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरात श्रीमान सोसायटीत राजगुरूनगर न्यायालयाचे सरकारी वकील ॲड. गिरीश कोबल राहतात. त्यांच्या घराच्या अंगणात पहाटे दोन वाजता बिबट्या थांबून होता. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

मुळात परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिक भयभीत आहेत. अनेकांना बिबट्याचे दर्शन झाल्यावर वनविभागाने किवणे मळा परिसरात आठ दिवसांपूर्वी पिंजरा लावून ठेवला आहे. बिबट्याने मात्र तिकडे न फिरकता विरुध्द बाजूच्या कॉलनीत मोर्चा वळवल्याचे समोर आले आहे. मागील आठवड्यात शेतकरी दत्तोबा सातकर यांना बिबट्या सामोरा गेला होता. ही घटना समोर आल्याने येथील रहिवासी , शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे. ॲड. गिरीश कोबल यांच्या घराच्या व्हरांड्यात मंगळवारी पहाटे दोन वाजता बिबट्या आला. साडेचार फुटांची भिंत आणि त्यावर दीड फुटाचे लोखंडी पाइप असतानाही त्यावरून बिबट्याने अंगणात उडी मारत प्रवेश केला. यात बिबट्याचा सहा मिनिटांचा वेळ गेला. त्यानंतर बिबट्याने अंगणात असलेल्या कुत्र्याला जबड्यात पकडले. पण कुत्र्याच्या गळ्यात कातडी पट्टा असल्याने बिबट्याला घट्ट पकड करता आले नाही. कुत्र्याने जीवाच्या आकांताने ओरडत इकडे तिकडे पळापळ केली. ओरडण्याचा आवाज ऐकू आल्यावर ॲड. कोबल परिवारासह जागे झाले. त्यांनी आरडाओरडा केला. त्याला बिबट्याने दाद दिली नाही. अखेर हाताला लागतील ती भांडी घेऊन कोबल व परिवाराने जोरात वाजवायला सुरुवात केली. तो आवाज ऐकून बिबट्याने जबड्यात पकडलेल्या कुत्र्याला सोडून देत धूम ठोकली. जवळपास सात मिनिटे बिबट्या या ठिकाणी होता. या सर्व घटनेचे सीसी टीव्ही कॅमेऱ्यात चित्रीकरण झाले आहे.

Web Title: Leopard in the courtyard of a house in Rajgurunagar city area; Caught the dog in the jaws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.