खेड तालुक्यात बिबट्याचा धुमाकुळ; हल्ल्यात महिला गंभीर जखमी, दिड महिन्यातील चौथी घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 01:18 PM2022-05-11T13:18:37+5:302022-05-11T13:18:47+5:30
गेल्या दीड महिन्यात बिबट्याने साडेतीन वर्षीय चिमुकल्यावर, नऊ वर्षीय मुलावर हल्ला केला होता
राजगुरूनगर : रेटवडी ( ता खेड ) येथे दोन महिलांवर दोन बिबट्यानी वेगवेगळ्या ठिकाणी प्राणघातक हल्ला केल्याची घटना.मंगळवारी (दि १०) सायंकाळी घडली आहे. साडेसहा व आठ वाजता असे दोन हल्ले झाले त्यामुळे ग्रामस्थ भयभयीत झाले आहे. या हल्ल्यात अरुणा संजय भालेकर (वय,५०, रा सतारकावस्ती ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत.रिजवना अब्दुल पठाण या किरकोळ जखमी झाल्या आहेत.
रेटवडी परिसरातील सतारकावस्ती, बाबळदरा या वस्तीवर बिबट्याने गेल्या दोन महिन्यापासून धुमाकुळ घातला आहे. अरुणा भालेकर हि महिला नातेवाईकाचे लग्न उरकून सांयकाळी घरी एकट्या घरी जात असताना बिबट्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.त्यांच्या डोके, तोंडावर बिबट्याने पंजा आणि चावा घेतल्याने गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांना सुरुवातीला चांडोली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र खोलवर जखमा होऊन रक्तस्राव झाल्याने त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. पहिल्या म्हणजे साडेसहा वाजता झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यात रिजवना अब्दुल पठाण या किरकोळ जखमी झाल्या. रेटवडीच्या पठाण वस्ती येथे हा हल्ला झाला. साडेसहा वाजता हल्ला झाल्यावर ग्रामस्थांनी वनविभागाला कळविले. राजगुरूनगरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदिप रौधळ, वनपरिमंडळ अधिकारी दत्ता फापाळे, शिवाजी राठोड हे घटनास्थळी पोहोचले.
तेव्हा बिबट्या झुडुपात असल्याचे बॅटरीच्या उजेडात पाहिल्यावर निदर्शनास आले. समोर बिबट्या असतानाच आठ वाजता दिड किलोमीटर अंतरावर असलेल्या सतारकावस्तीवर अरुणा भालेकर या महिलेवर हल्ला झाल्याची माहिती मिळाली. जखमी महिलेला उपचारासाठी हलविण्यात आले. गेल्या दीड महिन्यात बिबट्याने साडेतीन वर्षीय चिमुकल्यावर, नऊ वर्षीय मुलावर हल्ला केला होता. बिबट्याचा हल्ला होण्याची गावात ही चौथी घटना असुन यामुळे रेटवडी ग्रामस्थांमध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण पसरले आहे.