रांजणगाव सांडसला बिबट्याचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:10 AM2021-03-23T04:10:09+5:302021-03-23T04:10:09+5:30
नदीकाठच्या भागातील ऊस हे साखर कारखाने व गूळ गुऱ्हाळासाठी तोडणी झाल्यामुळे अनेक क्षेत्र मोठ्या प्रमाणात मोकळी झाली आहेत. त्यामुळे ...
नदीकाठच्या भागातील ऊस हे साखर कारखाने व गूळ गुऱ्हाळासाठी तोडणी झाल्यामुळे अनेक क्षेत्र मोठ्या प्रमाणात मोकळी झाली आहेत. त्यामुळे बिबट्याचा वावर एका शेतातून दुसऱ्या शेतात नागरिकांना दिसत आहे. बिबट्या हा ओढ्याच्या कडेला व पाण्याच्या ठिकाणी नागरिकांना नेहमी पाहावयास मिळत आहे. भाऊसाहेब कोळपे हे मोर मळा परिसरात आपल्याकडील शेळ्या-मेंढ्या चारत असताना, उसाच्या शेतातून बिबट्याने अचानक शेळीवर हल्ला करून कोळपे यांच्यासमोर शेळीला फरफटत ओढत उसाच्या शेतात नेले व फडशा पाडला. कोळपे यांनी आरडाओरडा केला व शेतातील शेतकरी त्यांच्या मदतीला धावत आले, म्हणून इतर शेळ्यांचा बचाव झाला, तसेच वीज भारनियमन हे रात्रीचे असल्यामुळे रात्रीच्या वेळेस शेतकरी शेतात पाणी पाहण्यास जाण्यासही घाबरत आहे. या भागात वनविभागाला वारंवार पिंजरा लावण्याची मागणी करूनही वनविभाग पूर्णपणे डोळेझाक करत आहे.
विजेचे भारनियमन हे रात्रीचे करावे व शेतीला वीजपुरवठा दिवसा सुरू करावा, जेणेकरून शेतातील कामे ही दिवसा शेतकऱ्यांना एकत्रितपणे करता येतात, परंतु रात्रीच्या वेळेस बिबट्या दहशतीखाली नागरिक घरातूनही बाहेर पडत नाही. शितोळे वस्ती परिसरात वन विभागाने हायमॅक्स दिवे बसवावे.
सोपान शितोळे -युवा शेतकरी.