Leopard Attack In Daund: अडीच महिन्याच्या बाळावर हल्ला करणारा बिबट्या जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 03:05 PM2024-11-19T15:05:07+5:302024-11-19T15:06:33+5:30

वनविभागाने एवढी तत्परता अगोदर दाखवली असती तर त्या चिमुरड्याचा जीव वाचला असता

Leopard jailed for attacking two-and-a-half-month-old baby | Leopard Attack In Daund: अडीच महिन्याच्या बाळावर हल्ला करणारा बिबट्या जेरबंद

Leopard Attack In Daund: अडीच महिन्याच्या बाळावर हल्ला करणारा बिबट्या जेरबंद

केडगाव/वरवंड : बोरीपार्धी ता.दौंड येथे ऊसतोड मजुराच्या अवघ्या अडीच महिन्याच्या बालकाचा जीव घेणारा बिबट्या वन विभागाकडून जेरबंद करण्यात आला. या नर जातीच्या बिबट्याने हल्ला केल्याने परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. 
             
नागरिकांची काल दि. १७ रोजी घटनास्थळी वन अधिकाऱ्यांना घेराव घालून प्रचंड वादावादी झाली होती. वन विभागाचे वरिष्ठ कार्यालयापासून रेस्क्यू टीमचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. ग्रामस्थांनी कुठलेही परिस्थितीत बिबट्याचा बंदोबस्त करण्याचा आग्रह वन अधिकाऱ्यांसमोर धरला होता. मनुष्याचा एक बळी गेल्यानंतर पुढील घटना घडण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे वनविभागाने उशिरा का होईना पावले उचलण्यास सुरुवात केली. सुरुवातीला रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. त्यानंतर संपूर्ण परिसर ड्रोनच्या मदतीने पिंजून काढण्यात आला. मात्र बिबट्या सापडला नाही. रात्री परिसरात पिंजरे लावण्यात आले. मात्र सकाळी निराशाच पदरी पडल्याने वन अधिकारी आणखी चिंताग्रस्त झाले होते. त्यातच परिसरातील अनेक नागरिकांनी व संघटनांनी वन कर्मचाऱ्यांना धारेवर धरले होते. बाळू भागुजी टेंगले रा. धायगुडेवाडी बोरीपार्धी ता. दौंड यांच्या क्षेत्र गट नंबर १३९ मध्ये दि १७ रोजी ऊसतोड चालू असताना ऊसतोड मजुराच्या चिमुकल्याचा बिबट हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्याच ठिकाणी वन विभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. त्या पिंजऱ्यात दि. १८ रोजी सायंकाळी साडेआठच्या दरम्यान बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. घटनास्थळी उपवनसंरक्षक पुणे महादेव मोहिते, वन संरक्षक दीपक पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी दौंड राहुल काळे, योगिता नायकवाडी, अंकुश खरात, वनरक्षक शितल मेरगळ, नानासो चव्हाण यांनी भेट दिली. रेस्क्यू टीम पुणे नचिकेत अवधाने, तोहीन सातारकर,वन्यजीव अभ्यासक आदित्य परांजपे, यांनी योग्य ती मदत केली. परिसरातील बिबट-मानव संघर्ष होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी ग्रामस्थांनी घ्यावी व सतर्क राहावे असे वनविभागाने आवाहन केले.

Web Title: Leopard jailed for attacking two-and-a-half-month-old baby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.