जाधववाडीत विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद
By admin | Published: June 28, 2015 12:28 AM2015-06-28T00:28:05+5:302015-06-28T00:28:05+5:30
जाधववाडी (ता. जुन्नर) येथील लोखंडेवस्तीच्या शिवारात आज पहाटेच्या सुमारास भक्ष्याच्या शोधार्थ विहिरीत पडलेल्या बिबट्याला ग्रामस्थांनी सतर्कता दाखवत काही तासांतच जीवदान दिले.
राजुरी : जाधववाडी (ता. जुन्नर) येथील लोखंडेवस्तीच्या शिवारात आज पहाटेच्या सुमारास भक्ष्याच्या शोधार्थ विहिरीत पडलेल्या बिबट्याला ग्रामस्थांनी सतर्कता दाखवत काही तासांतच जीवदान दिले.
दरम्यान, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने पिंजरा विहिरीत सोडून या बिबट्याला जेरबंद केले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बोरी परिसरातील जाधववाडीतील लोखंडे वस्तीतील दत्तात्रय सुखदेव घोलप यांच्या उसाच्या शेतातील विहिरीत आज पहाटेच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात असताना बिबट्या पडला. सकाळीच त्यांचा पुतण्या अवधुत बाळशीराम घोलप यांनी या विहिरीत डरकाळीचा आवाज ऐकला. घोलप कुटुंबीय विहिरीपाशी गेले असता, त्यांना बिबट्या पडल्याचे दिसले.
बिबट्या आपला जीव वाचवण्यासाठी कासावीस झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी भ्रमणध्वनीवरून ग्रामस्थांना बोलावून तातडीने एक मोठी दोरी खाली सोडली. तोच कासावीस झालेल्या बिबट्याने त्या दोरीचा आधार घेतला बुडता बुडता बिबट्याचे प्राण वाचले व नंतर चौपाळा विहिरीत सोडला. बिबट्याला या चौपाळ्याचा जीव वाचवण्यासाठी भक्कम आधार मिळाला.वनविभागाला याबाबत ग्रामस्थांनी सकाळीच माहिती दिली. आळे वनविभाग अधिकारी व कर्मचारी तसेच एसओएसचे कर्मचारी सकाळच्या सुमारास पिंजऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या सहकार्याने त्यांनी पिंजरा विहिरीत सोडला. अवघ्या काही मिनिटातच बिबट्या या पिंजऱ्यात जेरबंद झाला. या बिबट्याला जुन्नरजवळील माणिकडोह बिबट्या निवारण केंद्रात नेऊन सोडले.