पुण्यातील अहिरे गावात बिबट्याचे ‘मॉर्निंग वॉक’; वन विभाग व रेस्क्यू टीमने सुरक्षितपणे पकडले
By श्रीकिशन काळे | Published: March 20, 2023 02:41 PM2023-03-20T14:41:25+5:302023-03-20T14:47:59+5:30
सुदैवाने या बिबट्याने कोणालाही जखमी केले नाही
पुणे: वारजे परिसरातील अहिरे गावामध्ये सोमवारी सकाळीच बिबट्याचे दर्शन झाले आणि एकच गोंधळ उडाला. परंतु, सुदैवाने या बिबट्याने कोणालाही जखमी केलेले नाही. त्याला सुखरूप पकडून बावधन येथील रेस्क्यू टीमच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहेत. काही दिवसांनी त्याला निसर्गात सोडण्यात येईल.
नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी (एनडीए) च्या जंगलामध्ये बिबटे आढळून येतात. त्या ठिकाणाहून हा नर बिबट्या भटकंती करत अहिरे गावात आला होता. सोमवारी सकाळी ७.३० वाजता दिसून आला. त्यानंतर तिथे ७.५० वाजता रेस्क्यू व वन विभागाची टीम त्या ठिकाणी पोचली. त्यांनी बिबट्याला सुरक्षितपणे पकडले. डॉ. सुश्रृ्त शिरभाते यांनी त्याला ट्रान्कलाइज (बेशुध्द) केले. त्यानंतर एका घराच्या अतिशय अडगळीच्या जागेत तो लपलेला होता. तो बेशुध्द झाल्यानंतर त्याला रेस्क्यूच्या टीमने सुरक्षित बाहेर आणले आणि बावधन येथील उपचार केंद्रात दाखल केले. त्याला कुठलीही इजा झालेली नाही. त्यामुळे तो सुदृढ असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या वेळी सहाय्यक उपवनसंरक्षक दीपक पवार, वन परीक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ, रेस्क्यू टीमच्या नेहा पंचमीया, डॉ. सुश्रृत शिरभाते आदी उपस्थित होते.
अधिवासात कधी सोडायचे ते वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल
एनडीए परिसरातून हा बिबट्या आला असावा. कारण त्या ठिकाणी जंगल आहे. त्याच्या हल्ल्यात कोणीही जखमी झालेले नाही. त्याला सुरक्षित पकडण्यात आले. आता त्याला पुन्हा अधिवासात कधी सोडायचे ते वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. - प्रदीप संकपाळ, वन परिक्षेत्र अधिकारी
बंदोबस्त करणे आवश्यक
एनडीएच्या भागात घनदाट जंगल आहे. तसेच पुढे सिंहगड परिसर व ताम्हिणी घाटाचा परिसर आहे. त्यामुळे या पट्ट्यात बिबट्याचे अस्तित्व आहे. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने बिबट्याचे पुण्याच्या वेशीवर दर्शन होत आहे. भविष्यात तो शहरात येण्यापूर्वीच त्याचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे, अशी मागणी होत आहे.