Pune: घरासमोर खेळणाऱ्या चिमुकल्यावर बिबट्याची झडप, चार वर्षीय बालकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 01:30 PM2023-10-10T13:30:56+5:302023-10-10T13:31:25+5:30
बिबट्याचा वावर असलेल्या आळे शिवारातील आगरमळा येथे शिवांश हा घरासमोर ओट्यावर सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास खेळत होता..
पिंपरी पेंढार (पुणे) : आळे (ता. जुन्नर) शिवारातील आगरमळा येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.९) रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान घडली. शिवांश अमोल भुजबळ (वय ४ ) असे मृत बालकाचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बिबट्याचा वावर असलेल्या आळे शिवारातील आगरमळा येथे शिवांश हा घरासमोर ओट्यावर सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास खेळत होता. त्याचे आजोबाही त्या ठिकाणी होते. यावेळी घराचे समोरील शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानकपणे शिवांशवर हल्ला करत त्यास फरफटत बाजूच्या उसाचे शेतात नेले.
दरम्यान, यावेळी बाजूला असलेल्या अविनाश गडगे या तरुणाने हिम्मत दाखवत बिबट्याच्या मागे पळत जाऊन त्यास दगड मारत व काठीचा धाक धाकवून चिमुरड्या शिवांशला बिबट्यापासून सोडवले. परंतु या हल्ल्यात शिवांश गंभीर जखमी झाला. त्याला आळेफाटा येथील रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. माजी पंचायत समिती सदस्य नेताजी डोके, सरपंच प्रीतम काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसन्न डोके, पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे, गणेश गुंजाळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येत जमा झाले. त्यांनी या घटनेबाबत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
आगरमळा येथे गेल्या काही दिवसांपासून दोन बिबटे व दोन बछड्यांचा वावर आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला मात्र त्यात बछडा अडकला त्यास तेथेच सोडण्यात आले. नरभक्षक झालेल्या या बिबट्याचा वनविभागाने त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. याबाबत वनविभाग अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला; मात्र तो होऊ शकला नाही.