पुरंदर तालुक्यातील बिबट्या अखेर जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 12:19 AM2018-11-10T00:19:22+5:302018-11-10T00:19:45+5:30
पुरंदर तालुक्यातील उदाची वाडीपासून एक किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कपारीत लपलेल्या बिबट्याला वन विभागाच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या मदतीने पकडण्यात यश आले.
सासवड - पुरंदर तालुक्यातील उदाची वाडीपासून एक किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कपारीत लपलेल्या बिबट्याला वन विभागाच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या मदतीने पकडण्यात यश आले.
याबाबत माहिती अशी की, स्थानिक ग्रामस्थ काळूराम कुंभारकर यांना बिबट्या डोंगर कपारीत लपल्याचे आढळून आल्यानंतर त्यांनी चौकसपणे पाहणी केली. तेव्हा त्यांना चिंकारा जातीच्या काळवीटाची शिकार झाल्याचे दिसले. कुंभारकर यांनी ग्रामस्थांना ही माहिती दिल्यानंतर ग्रामस्थ डोंगराच्या परिसरात बिबट्या पाहण्यासाठी गेले. यावेळी त्यांना जवळच काळवीट मरून पडल्याचे दिसले. बिबट्या मात्र डोंगराच्या कपारीत लपल्याचे ग्रामस्थांनी पाहिले. याची खबर तात्काळ ग्रामस्थांनी वन विभागाकडे कळवली. वनविभागाचे अधिकारी तातडीने या ठिकाणी पोहोचले.
बिबट्याची खात्री करून कात्रज येथून रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. सुरुवातीला पिंजरा लावून जाळे टाकून बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, चवताळलेल्या बिबट्याने दोन कर्मचाºयांवर हल्ला केला. यात दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांची नावे समजू शकली नाहीत.
बिबट्याला पकडण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ झाल्यानंतर डॉटच्या साहाय्याने बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले. २ वर्षे वयाची व ४५किलो वजनाची ही मादी आहे. यावेळी मोबाईल अथवा कॅमेºयांमधून छायाचित्र अथवा व्हिडीओ घेण्यास मनाई करण्यात आली होती. बिबट्याचा वावर असलेल्या एक किलोमीटरच्या परिघात कोणालाही येण्यास मनाई होती.
ही कारवाई दुपारी ३.३० पासून रात्री ७.३० पर्यंत सुरू होती. बिबट्याला जेरबंद केल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पकडलेल्या बिबट्याला ताम्हिणी परीसरातील जंगलात सोडण्यात येणार असल्याचे रेस्क्यू टीमने सांगितले.