थरार.! वनविभागाच्या फाटक्या जाळीतून बिबट्या झाला पसार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 06:11 PM2019-11-05T18:11:20+5:302019-11-05T18:56:24+5:30
वनविभागाच्या बेजबाबदार कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; नागरिकांमध्ये संताप..
भानुदास पऱ्हाड -
शेलपिंपळगाव : कोयाळी - भानोबाची (ता. खेड) येथे वनविभागाच्या जाळ्यात अडकलेला बिबट्याचा बछडा धूम ठोकून उसाच्या शेतात पसार झाला. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभाग प्रशासनाच्या बेजबाबदार कार्यपद्धतीमुळे जाळ्यात अडकलेला बछडा पळून जाण्यात यशस्वी झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे बिबट्या पळून गेल्यानंतर वनविभाग प्रशासनाने लगतच्या शेतात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला आहे.
खेड तालुक्याच्या पूर्व भागातील कोयाळी - भानोबाची, साबळेवाडी, मरकळ, गोलेगाव - पिंपळगाव, बंगलावस्ती, दौंडकरवाडी, रामनगर, साबळेवस्ती, चिंचोशी आदी ठिकाणी बिबट्यांचे वास्तव्य असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. मात्र मंगळवारी (दि.५) रात्री अडीचच्या सुमारास कोयाळीतील बापदेववस्ती येथे शिकारीच्या शोधात एक बिबट्या थेट भर लोकवस्तीत शिरला. मात्र येथील उपसरपंच विठ्ठल कोळेकर यांच्या घरासमोर कुत्र्यांची आणि बिबट्याची झटापट झाली. दरम्यान मोठमोठ्याने कुत्र्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून नागरीक झोपेतून उठून घराबाहेर आले असता झाडावर त्यांना बिबटया पहायला मिळाला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपसरपंच विठ्ठल कोळेकर यांनी तात्काळ गावातील वनकर्मचारी भानुदास गायकवाड यांना ही घटना सांगितली. त्यानंतर पहाटे साडेचार ते पाचच्या दरम्यान वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र सुरुवातीला त्यांनी बिबट्याला झाडावरून हुसकवण्याचा प्रयत्न केला असता स्थानिक नागरिकांनी त्यास विरोध केला. यामध्ये वनविभाग अधिकारी व स्थानिक नागरिकांची 'तु - तू मे मै' झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सूर्योदयानंतर वनविभाग प्रशासनाने घटनास्थळी ३० ते ४० कर्मचाऱ्यांना पाचारण करून बाभळीच्या शेंड्यावर बसलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी 'रेस्क्यू ऑपरेशन' सुरू केले. प्रारंभी बाभळीच्या झाडालगत स्थानिक तरुणांच्या साह्याने जाळे पसरविण्यात आले. त्यानंतर जेसीबीच्या साह्याने बंदुकीद्वारे बिबट्यास बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला असता बिबट्याने झाडावरून जमिनीवर उडी मारली. परंतु वनविभागाने पसरविलेली जाळी फाटकी असल्याने बिबट्या जाळीतून लगत असलेल्या उसाच्या शेतात पळून जाण्यास यशस्वी झाला.
दरम्यान बिबट्याच्या दर्शनाने कोयाळीसह आजूबाजूच्या परिसरात घबराटीचे वातावरणात पसरले आहे. लोकवस्तीत शिरकाव करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने तात्काळ सात ते आठ ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब कोळेकर, सरपंच मंगल दिघे, उपसरपंच विठ्ठल कोळेकर, ग्रामपंचायत सदस्य विकास भिवरे, बापूसाहेब सरवदे, संजय दिघे, माजी सरपंच बाळासाहेब येधुजी कोळेकर, भुदेव शिंदे, आप्पा दिघे आदींनी केली आहे.
वनविभागाकडे दजेर्हीन साहित्य... खेडच्या पूर्व भागांतील अनेक गावांमध्ये बिबट्यांचे वास्तव्य असल्याचे अनेक घटनांमधून समोर येत आहे. एकीकडे बिबट्यांना जेरबंद करण्याची वारंवार मागणी होत आहे. दुसरीकडे मात्र वनविभागाच्या हातात सापडलेला बिबट्या फाटक्या जाळीमुळे पसार होत असेल तर वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तसेच वनविभागाकडे असलेले साहित्य दजेर्हीन असल्याचे या घटनेतून उघड झाले आहे.
कोयाळीत आढळून आलेला बिबट्याचा बछडा पकडण्यासाठी पुणे व जुन्नरचे पथक तैनात करण्यात आले होते. त्याला पकडण्यात प्रशासनाला अपयश आले. मात्र योग्य ती खबरदारी घेऊन त्यास जेरबंद केले जाईल. त्याठिकाणी मुबलक खाद्य, पाणी आणि लपायला जागा उपलब्ध असल्याने बिबट्या एकाच जागी जास्त काळ वास्तव्यास राहू शकतो. बिबटया सदृश भागातील नागरिकांनी सतर्क रहावे.
- जयरामेगौडा आर. उपवनसंरक्षक जुन्नर विभाग.
अंदाजे एक वर्षाचा बिबट्याचा बछडा बाभळीच्या झाडावर बसल्याने आढळून आल्यानंतर तात्काळ वनविभागाला कळविले. मात्र वनविभाग प्रशासनाच्या बेजबाबदार कार्यपद्धतीमुळे बछडा पळून जाण्यात यशस्वी झाला. परिसरात दोन ते तीन बिबट्यांची वास्तव्य असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे तात्काळ उपाययोजना करावी.