बारामती एमआयडीसी परिसरात बिबट्याचा वावर, दहशतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 06:50 PM2019-12-09T18:50:50+5:302019-12-09T18:55:20+5:30
बिबट्याचा जिल्ह्यातील वाढता वावर धडकी भरवणारा
बारामती : बारामती कटफळ परिसरातील एमआयडीसीतील बाऊली इंडिया बेक्स अँड स्वीटस प्रा.ली. कंपनीच्या आवारात सोमवारी (ता. ९) रात्री पहाटे बिबट्याचा वावर कंपनीच्या सीसीटीव्हीमध्ये आढळला. केवळ सीसीटीव्ही मुळे बिबट्याचा वावर उघड झाला आहे. परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
आज बाऊली कंपनीजवळ कटफळ रेल्वे स्टेशनसमोर कंंपनीत वाघ आल्याबाबत शहर पोलीस ठाण्याचे दुरध्वनी खणाणले. त्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी,वनविभाग अधिकाऱ्यांनी तातडीने या ठिकाणी धाव घेतली. यावेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कंपनीच्या आवारात बिबट्याचा वावर आढळला. पहाटे पाच वाजता वन विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी कंपनीचा संपर्ण परिसर पिंजुन काढला. मात्र, काहीही आढळून आले नाही. तर अधिकारी कर्मचारीही भीतीने आपल्या केबिनमध्येच बसून राहिले. दरम्यान, पाच वाजता वन विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी कंपनीचा संपूर्ण परिसरात शोध घेतला.मात्र काहीही आढळून आले नाही. बिबट्याने ठिकाण बदलले असावे, असा अंदाज वर्तवला जात आहे. बिबट्या आढळल्याने कटफळ, सावळ, वंजारवाडी, गाडीखेल, गोजुबावी, जैनकवाडी आदी गावांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. वन विभागाने संबंधित भागातील ग्रामस्थांनी समूहाने राहत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
पर्यावरण तज्ज्ञ डॉ. महेश गायकवाड यांनी ' लोकमत 'शी बोलताना सांगितले की, सध्या बिबट्याच्या पिढ्या ऊसाच्या क्षेत्रामध्येच जन्मल्या आहेत. त्यामुळे त्यांचा ऊसाचे क्षेत्र त्यांचा नैसर्गिक अधिवास झाला आहे. बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर आदी भाग गवताळ व खुरट्या काटेरी वनस्पतींनी व्यापलेला आहे. मात्र ,बिबट्या शिकारीसाठी या भागात फिरू शकतो. तो गवताळ व खुरट्या वनस्पती असलेल्या भागाला आपला अधिवास कधीही बनवणार नाही. त्यामुळे बागायती क्षेत्रातील शेतकऱ्यांनी शेतात वावरताना काळजी घ्यावी. हातात घुंगराची काठी ठेवावी. चार-पाच जणांच्या घोळक्याने शेतात वावरावे. वनविभागाने देखील या पार्श्वभूमीवर बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड आदी तालुक्यांमध्ये गावा-गावात मोहिम राबवून बिबट्याच्या सवयी आणि त्याच्यापासून बचावाचे उपाय याबाबत माहिती द्यावी, बिबट्या दिसल्यास तातडीने वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन देखील शेतकऱ्यांना करण्यात यावे, असे डॉ. गायकवाड यांनी सांगितले.
एमआयडीसीमधील बाऊली कंपनीच्या आवारामध्ये बिबट्या दिसून आलेला आहे. हा बिबट्या आजूबाजूच्या परिसरात फिरत आहे. ग्रामस्थांनी यासंबंधी आवश्यक ती दक्षता घ्यावी. बिबट्याची काही हालचाल, माहिती मिळाल्यास तात्काळ बारामती तालुका पोलिस ठाण्याशी ०२११२-२४३४३३ या क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांनी केले आहे.