शिरुर परिसरात बिबट्याचा वावर
By Admin | Published: January 29, 2015 11:42 PM2015-01-29T23:42:04+5:302015-01-29T23:42:04+5:30
घोडनदीच्या किनाऱ्याजवळ असणाऱ्या शहरातील कुंभारआळी परिसरात तेथील नागरिकांना बिबट्या आढळून आला असून
शिरुर : घोडनदीच्या किनाऱ्याजवळ असणाऱ्या शहरातील कुंभारआळी परिसरात तेथील नागरिकांना बिबट्या आढळून आला असून त्याच्या पायाच्या ठश्यांवरुन तो बिबट्याच असल्याचे वनाधिकारी डी.वाय. भुर्के यांनी स्पष्ट केले.
कुुंभारआळी भागात नदीच्या किनारी तेथील नागरिकांच्या वीटभट्टया आहेत. काल रात्री कुत्र्यांच्या जोरजोरात भुंकण्याचा आवाज आल्याने नागरिकांनी तेथे जाऊन पाहिले असता बिबट्यासदृश प्राणी त्यांना दिसून आला. भेदरलेल्या नागरिकांनी याबाबत वनविभागास कळविल्यावर वनाधिकारी भुर्के यांच्यासह त्यांच्या पथकाने पायांच्या ठश्यांची पाहणी केली. ‘प्लॅस्टर आॅफ पॅरिस’ ठश्यावर टाकून विशिष्ठ पद्धतीनेही पाहणी केली असता हे ठसे बिबट्याचेच असल्याचे भुर्के यांनी स्पष्ट केले. घोडनदीच्या पालिकडील किनारी मोठ्या प्रमाणावर ऊसाचे क्षेत्र असून या परिसरातून पाण्यातून पोहून बिबट्या या बाजूला (कुंभारआळी परिसरात) आला असावा असा इशारा वनविभागाने बांधला आहे.
नदी किनारी वास्तव्यास असणाऱ्या कुंभारआळीसह इतर भागातील नागरिकांमध्ये बिबट्याच्या वावरामुळे प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.