बिबट्याचा मॉर्निंग वॉक... तो दिसला अन् ५ तास थरार रंगला; भूल देऊन पिंजऱ्यात टाकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2023 05:50 AM2023-12-29T05:50:38+5:302023-12-29T05:50:50+5:30
ड्रोन, जेसीबी, उंच शिडीचा वापर.
रामहरी केदार, लोकमत न्यूज नेटवर्क, चिखली (जि.पुणे) : गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास बिबट्या दिसल्याने खळबळ उडाली. सुरुवातीला रस्त्यावर, त्यानंतर गोठ्यात आणि तेथून उसाच्या शेतात गेलेल्या बिबट्याला पकडताना वनविभाग, महापालिका अग्निशमन दल आणि बचाव पथकांची दमछाक झाली. ड्रोन कॅमेरा, जेसीबी, उंच शिडी वापरले असे सारे काही वापरून पाहिले... अखेर, सकाळी सव्वादहाच्या सुमारास बेशुद्ध करून बिबट्याला पकडण्यात यश आले.
पिंपरी - चिंचवडमधील चिखली येथील मंदिरात पहाटे काकडा आरतीसाठी लक्ष्मण साने जात होते. त्यांना देहू - आळंदी रस्त्यावर बिबट्या दिसला. ही माहिती शहरभर पसरली. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तो बिबट्याच असल्याचे समोर आले. सामाजिक कार्यकर्ते विकास साने यांनी प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधला. पोलिस, महापालिका व वन विभागाचे बचाव पथक दाखल झाले. अशोक मोरे यांच्या गोठ्यात बिबट्या घुसल्याचे समोर आले. त्या घराजवळ पथके दाखल झाली.
मात्र, बंगल्याच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारून तो आत गेल्याचे दिसून आले. गोठ्यात जनावरे असल्याने त्याला बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन देण्यात अडचण येत हाेती. तेवढ्यात त्याने ज्वारीच्या शेतात उडी मारली. दरम्यान, दाट वस्तीमुळे गोंधळ उडाला. बघ्यांची मोठी गर्दी झाली. जेसीबी व ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने बिबट्यावर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न केला जात होता. अखेर बिबट्याला भुलीचे इंजेक्शन मारून बेशुद्ध केले.
स्थानिक पोलिस, महापालिका प्रशासन व वन विभागातील वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने व सर्वांच्या सहकार्याने बिबट्याला पकडण्यात यश आले. - प्रदीप संकपाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी, पुणे
पहाटे ४:५० वाजता : देहू-आळंदी रस्त्यावर बिबट्याचे दर्शन.
सकाळी ६:०५ वाजता : पुणे वन विभागाचे बचाव पथक चिखलीत दाखल. काही वेळात पोलिसही घटनास्थळी दाखल.
सकाळी १०:१५ वाजता बेशुद्ध करून पकडले.