Video: जुन्नर तालुक्यात बिबट्यांची दहशत; रस्त्यातच ३ बिबट्यांचा मुक्तसंचार, नागरिकात भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 05:55 PM2024-10-18T17:55:35+5:302024-10-18T17:58:13+5:30
वनविभागाने बिबट्यांच्या वाढत्या संख्येला रोखण्यासाठी लवकरात लवकर नियोजन करावे, ग्रामस्थांची मागणी
आळेफाटा : शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास एकाचवेळी तीन बिबट्यांचा मुक्तसंचार पाहून नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. शेतात चाललेल्या शेतकऱ्याने ते सगळं मोबाईलमध्ये कैद केलं. संबधित शेतकरी ट्रॅक्टरमध्ये असल्याने तो बचावला. ही घटना जुन्नर तालुक्यातील आळेफाटा परिसरातील मोरया हॉस्पिटल जवळील आहे.
जुन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत वाढली असल्याच्या रोज नव्याने पाहायला मिळत आहे. बिबट्यांचे मानवी हल्ले किंवा पाळीव प्राणी हल्ल्यांचे प्रमाणही वाढत आहे. आळेफाटा परिसरात मोठ्या रहिवाशी इमारती झाल्या आहेत. बिबट्यांची संख्या वाढत असल्यामुळे नव्याने जन्म झालेले बछडे अन्न व पाण्याच्या शोधात थेट आळेफाटा परिसरात येत आहेत. मात्र आळेफाटा परिसरात दाखल झालेले बिबट्या पकडण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. ३ बिबटे उभे असलेला हा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाल्यानंतर नागरिक घाबरले असून वन विभागाला त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
जुन्नर तालुक्यात बिबट्यांची दहशत; रस्त्यातच ३ बिबट्यांचा मुक्तसंचार, नागरिकात भीतीचे वातावरण#Pune#junnar#leopardpic.twitter.com/QtcxpBpbQt
— Lokmat (@lokmat) October 18, 2024
महिला शेतकऱ्यांना गमवावा लागतोय जीव
जुन्नर परिसरात बिबट्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. महिला राखणदार शेतात गेल्यावर बिबट हल्ला होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. मागील काही महिन्यांपूर्वी दोन महिलांनी बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमावला होता. शेतकरी आणि जुन्नर तालुकयातील नागरिक सध्यस्थितीत भयभीत झाले आहेत. दिवसाढवळ्या अथवा रात्रीही बिबट्याचे हल्ले होताना दिसत आहेत. महिला, लहान मुलांबरोबरच इतरांचाही जीव धोक्यात असल्याचे समोर आले आहे. वनविभागाने बिबट्यांच्या वाढत्या संख्येला रोखण्यासाठी लवकरात लवकर नियोजन करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.