मलघेवाडी येथे बिबट्याची दहशत, वासराचा फडशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:14 AM2021-09-04T04:14:32+5:302021-09-04T04:14:32+5:30
मलघेवाडी, मांजरेवाडी परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. ४ दिवसांपूर्वी येथे रात्रीच्या सुमारास शेतकरी रामभाऊ मलघे हे झोपलेले असताना शेजारीच ...
मलघेवाडी, मांजरेवाडी परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. ४ दिवसांपूर्वी येथे रात्रीच्या सुमारास शेतकरी रामभाऊ मलघे हे झोपलेले असताना शेजारीच त्यांची जनावरांच्या निवारासाठी असलेल्या गोठ्यात इतर जनावरांच्या सोबत एक वासरू होते. या वेळी भक्ष्य शोधण्यासाठी आलेल्या बिबट्याने पडवीत घुसून वासराला फरफटत नेऊन फडशा पाडला. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्या फिरत असल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास येत आहे. भिमानदीकाठी एका शेतालगत झाडीझुडपांत बिबट्याने बसण्यासाठी जागा केली आहे. या ठिकाणी बिबट्याच्या पाऊलाचे ठसे शेतकऱ्यांना आढळून आले आहे. वनविभागाचे वनरक्षक सुषमा चौधरी, दत्तात्रय फाफाळे यांनी मलघेवाडी येथे शेतकऱ्यांमध्ये जाऊन जनजागृती केली आहे. शेतकऱ्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा बसवावा, अशी मागणी केली, मात्र पिंजरा उपलब्ध नसल्यामुळे काही दिवस थांबा असे वनविभागाने शेतकऱ्यांना सांगितले आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्याच्या या दहशतीमुळे शेतकरी रात्री पिकांना पाणी देण्यासाठी बाहेर पडण्यास घाबरत आहेत. वनविभाग याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने भविष्यात सदर हल्लेखोर बिबट्या मानवावर हल्ला करू शकतो. तरी वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या परिसरात पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्यात यावे, अशी मागणी उपसरपंच सतीश मलघे, सुरेश मलघे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.