रानडुक्कराऐवजी बिबट्या झाला शिकार! आठवडाभर फासात अडकल्याने गेला जीव
By श्रीकिशन बलभीम काळे | Updated: October 7, 2022 16:08 IST2022-10-07T15:59:21+5:302022-10-07T16:08:56+5:30
अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला....

रानडुक्कराऐवजी बिबट्या झाला शिकार! आठवडाभर फासात अडकल्याने गेला जीव
पुणे : रानडुकराची शिकार करायची होती, त्यासाठी लावलेल्या जाळ्यात एक बिबट्या सापडला आणि त्यातच त्याला आपला जीव गमवावा लागला. कारण जाळ्यात बिबट्या अडकल्यानंतर तो आठवडाभर तिथेच अडकून पडला होता आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून, दौंड तालुक्यातील लडकतवाडी येथे ही घटना घडली आहे. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लडकतवाडी येथील शेतकरी शशिकांत लडकत यांची उसाची शेती आहे. या शेतीशेजारीच एका शिकाऱ्याने डुकरासाठी फास लावून ठेवला होता. त्यामध्ये नर बिबट्या अडकला. त्यातून त्याला बाहेर पडता आले नाही आणि काही दिवस तिकडे कोणी फिरकलेही नाही. त्यामुळे बिबट्याचा तिथेच मृत्यू झाला. हा बिबट्या अंदाजे ६ वर्षांचा असल्याचा अंदाज आहे. त्या परिसरातून काही नागरिक जात असताना त्यांना हा बिबट्या मृत झाल्याचे दिसून आले. त्यांनी लगेच वन विभागाला याची माहिती दिली.
त्यानंतर वन अधिकारी घटनास्थळी पोहचले. सहाय्यक वनसंरक्षक दीपक पवार यांनी याविषयीची माहिती घेऊन पुढील कार्यवाही केली. या वेळी वनपारिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे, वनपाल सचिन पुरी, नानासाहेब चव्हाण, सुनिता शिरसाट, रमेश कोळेकर, विलास होले, सुरेश पवार, नौशाद शेख यांनी घटनास्थळाची पाहणी केली. मृत बिबट्याचे राहू येथील पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विकास अधिकारी अनिल इंगवले यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर मृत बिबट्याचे पिंपळगाव येथील वनक्षेत्रामध्ये दहन करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी वन विभागातर्फे करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी फास कोणी लावला, त्याचा शोध घेण्यात येत आहे.