पुणे : बेल्हे-कळस रस्त्यालगतच्या विहिरीतून बिबट्याला सुखरूप काढले बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 07:15 PM2022-06-04T19:15:17+5:302022-06-04T19:18:08+5:30
वनविभाग व स्थानिक नागरिकांनी बिबट्याला दिले जीवदान ..
बेल्हे (पुणे) : बेल्हे (ता.जुन्नर) येथील बेल्हे-कळस रस्त्यालगत असणाऱ्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शनिवार (दि.४) हौदबाग परिसरात एका विहिरीत पडलेल्या बिबट्यास वनविभागाने रेस्क्यू टीमच्या मदतीने विहिरीत पिंजरा सोडून सुरक्षित बाहेर काढले. दरम्यान या बिबट्यास वनविभागाच्या वतीने माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रात हलवण्यात आले आहे.
हरकचंद बोरा यांच्या शेताजवळील विहिरीत अंदाजे दीड वर्षे वयाचा एक बिबट्या पडला असल्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. संबंधितांनी ही माहिती तातडीने वनविभागाला कळवली. यावेळी बिबट्याला पाहण्यासाठी विहिरीच्या कठड्याभोवती नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. दरम्यान भक्षाचा पाठलाग करताना अथवा रस्ता क्रॉस करताना वाहनांच्या आवाजामुळे घाबरून रात्रीच्या वेळी हा बिबट्या विहिरीत पडला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
बिबट्या विहिरीत पोहून दमल्याने तो विद्युत मोटारीच्या पाईपचा आधार घेण्याचा प्रयत्न करीत होता. ग्रामस्थांनी दोर बांधून चौपाई विहिरीत सोडल्यानंतर हा बिबट्या चौपाईवर विसावला होता. दरम्यान वनविभागाने रेस्क्यू टीमच्या मदतीने विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला विहिरीतून सुरक्षित बाहेर काढले. दरम्यान या बिबट्यास वनविभागाच्या वतीने माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रात हलवण्यात आले असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.