बारामतीत आढळला बिबट्या, नागरिकांमध्ये सर्वत्र घबराटीचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 08:15 PM2021-04-03T20:15:24+5:302021-04-03T20:15:59+5:30
शोधमोहिमेत बिबट्याचा तपास नाही
माळेगाव खुर्द तालुका बारामती येथे बिबट्याचे ठसे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. बिबट्यामुळे सर्वत्र घबराट निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर घाबरून न जाता नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन वनाधिकारी व पोलिस यंत्रणेने केले आहे.
निरा डाव्या कॅनॉल वरुन जाणा-या पाईपलाईन वर बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत. तर संध्याकाळी साडे आठ वाजता बिबट्या प्रत्यक्ष पाहिल्याचे एका व्यक्तीचे म्हणणे आहे. सदर बिबट्या आढळून आल्याचे उद्योजक अमर काटे यांनी वनाधिकारी व पोलिसांना कळविले. त्यांनी बिबट्या आढळून आलेल्या परिसराची कसून तपासणी केली. पाईपलाईनवर उमटलेल्या ठशांची पहाणी केली असता ते ठसे बिबट्याचे असल्याचे आढळून आले. वन कर्मचारी व पोलिसांनी सर्व परिसर पिंजून काढला. बिबट्या दिसल्याची माहिती लोकांना सोशल मिडीयावरुन मिळाल्याने सर्व सतर्क झाले. रात्री दोन वाजेपर्यंत बिबट्याची शोध मोहीम सुरु होती. मात्र बिबट्याचा तपास लागला नाही.
वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे म्हणाले, माळेगाव खुर्द येथे बिबट्या आढळून आला आहे. सदरचा बिबट्या काटेवाडीतून आला असण्याची शक्यता आहे. तसेच तो एका जागेवर थांबत नाही. त्या बिबट्याने जनावरांवरती अथवा मनुष्यावर हल्ला केला नाही. त्यामुळे त्यास पकडण्यासाठी पिंजरा लावता येत नाही. बिबट्या दिसल्यास फटाके वाजवावेत, एकट्याने घराबाहेर अथवा शेतात जाऊ नये. सर्वांनी सतर्कता बाळगुन काळजी घ्यावी.