सिंहगड परिसरात बिबट्याचा वावर, पर्यटकांनी सावध राहावे !
By श्रीकिशन काळे | Published: October 26, 2023 07:44 PM2023-10-26T19:44:04+5:302023-10-26T19:44:24+5:30
दोन दिवसांपासून बिबट्यासोबत बछडेही फिरत असल्याचे दिसून येत आहे
पुणे : गेल्या काही दिवसांपासून किल्ले सिंहगड परिसरात बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांनी तिकडे सावध राहावे, असे आवाहन वन विभागातर्फे केले जात आहे. वन विभागाने सिंहगडावरील प्रवेशद्वाराजवळ फलकही लावला आहे. दोन दिवसांपूर्वी बिबट्यासोबत बछडेही फिरत असल्याचे दिसून येत आहे. किल्ले सिंहगड परिसरात गेल्या आठवड्यात एका ठिकाणी रात्री बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यानंतर पुन्हा आता बछड्यासह बिबट्या दिसून आला आहे.
त्यामुळे सिंहगडावर जाणाऱ्या पर्यटकांनी सावध राहणे आवश्यक आहे. सिंहगड हा परिसर घनदाट झाडीचा आहे. तिथून रायगडकडे डोंगररांगा आहेत. त्यामुळे या जंगलामध्ये बिबट्या व इतर वन्यजीवांचे वास्तव आहे. नागरिकांनी सावधपणे सिंहगड परिसरात फिरावे, असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
यापूर्वी गोऱ्हे खुर्द परिसरात काही महिन्यांपूर्वी बिबट्या आला होता. त्यानंतर अधूनमधून सिंहगड परिसरात त्याचे दर्शन व्हायचे. आता कोंढाणपूर फाट्याच्या ठिकाणी नवीन प्रवेशद्वार आहे. तिथे देखील तो गेल्या आठवड्यात दिसला होता. खरंतर बिबट्या आता पुणे शहराच्या अनेक ठिकाणी दिसत आहे. दिवे घाट, कात्रज-गुजरवाडी परिसर, वाघोली परिसरातही यापूर्वी दिसला आहे. काही दिवसांपूर्वीच दिवे घाटात भर रस्त्यात तो बसलेला होता. त्यामुळे या बिबट्यासाठी आता खास धोरण करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.