खोडदमध्ये बिबट्यांचा वावर; थेट पोल्ट्री फार्ममध्ये शिरण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 11:22 AM2021-09-03T11:22:53+5:302021-09-03T11:54:09+5:30
पोल्ट्री फार्मला बंदिस्त लोखंडी जाळी असल्याने बिबट्यांचा प्रयत्न अयशस्वी
पुणे : खोडद येथील निमगाव सावा रोडला तांबोळी यांच्या पोल्ट्रीकडे एकाच वेळी दोन बिबट्यांनी शिरण्याचा प्रयत्न केला आहे. या पोल्ट्री वर तांबोळी व त्यांचा मुलगा मयूर तांबोळी हे दोघे असतात. गुरुवारी २ सप्टेंबरला रात्री ११ दोन बिबटे या पोल्ट्री वर आले. आणि त्यांनी आत प्रवेश केला. यावेळी मयूर तांबोळी याने आपल्या मोबाईल मध्ये बिबट्यांचे शूटिंग घेतले. पोल्ट्री फार्मला बंदिस्त लोखंडी जाळी असल्याने बिबट्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला.
भक्ष्याच्या शोधात बिबट्यांचा सध्या मानवी वस्त्यांकडे वावर वाढू लागला आहे. जुन्नर तालुक्यात असलेले उसाचे क्षेत्र हा बिबट्यांचा मुख्य निवारा आहे. ऊसाच्या शेतात ससा, उंदीर, यासारखे सहजपणे मिळणारे भक्ष्य, पिण्यासाठी मिळणारे पाणी आणि लपण्यासाठी ही जागा सुरक्षित असल्याने उसाच्या शेताच्या परिसरात बिबटे हमखास आढळतात.
VIDEO: पुण्यात खोडद येथील निमगाव सावा रोडला तांबोळी यांच्या पोल्ट्रीकडे एकाच वेळी दोन बिबट्यांचं दर्शन; भीतीचं वातावरण pic.twitter.com/gL0bSPaH3q
— Lokmat (@MiLOKMAT) September 3, 2021
खेड तालुक्यातही बिबट्याने महिलेवर हल्ला करून मारले होते ठार
खेड तालुक्यातील वडगांव पाटोळे येथील साबळेवस्ती परीसरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास बिबट्याने महिलेवर हल्ला करून महिलेस ठार मारले होते. मृत महिला साबळेवाडी परिसरात झोपडीत राहत होती. रात्रीच्या सुमारास नरभक्षक बिबट्याने हल्ला करून ४०० फुट शेतात फरफटत नेले. नख आणि दाताने जखमा करून बिबट्याने शरीराचे लचके तोडले आहे. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. या ठिकाणी नरभक्षक बिबट्याचा वावर आहे. अनेक दिवसांपासून वडगांव पाटोळे परीसरात बिबट्या माणसावर हल्ले करत होता.
वडगाव-पाटोळे येथील गायकवाड वस्तीत केले होते एकाला जखमी
गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या माणसांवर हल्ला करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. काही दिवसापूर्वी वडगाव-पाटोळे येथील गायकवाड वस्तीत सुभाष गायकवाड यांच्यावर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. या परिसरात बिबट्याच्या धुमाकुळाने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. बिबट्याकडून माणसांवर वारंवार हल्ला करण्याचे प्रकार घडू लागल्याने परिसरात दहशत पसरली आहे. दहशतीमुळे नागरिक घराच्या बाहेर पडायला सुद्धा घाबरू लागले आहेत.