नियोजनाअभावी धरणांत कमी पाणीसाठा
By admin | Published: March 30, 2017 12:02 AM2017-03-30T00:02:04+5:302017-03-30T00:02:04+5:30
दिवसेंदिवस वाढत चाललेली उन्हाची तीव्रता आणि पावसाळा सुरू होण्यास अजून दोन ते अडीच महिने शिल्लक आहेत.
भोर : दिवसेंदिवस वाढत चाललेली उन्हाची तीव्रता आणि पावसाळा सुरू होण्यास अजून दोन ते अडीच महिने शिल्लक आहेत. मात्र, भोर तालुक्यातील भाटघर धरणात फक्त ३० टक्के, तर नीरादेवघर धरणात २६ टक्केच पाणीसाठ शिल्लक आहे. यामुळे धरणभागातील विहिरी, झरे व इतर पाण्याचे स्रोत आटल्यामुळे दोन्ही धरणभागांत पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली आहे. टॅँकर सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. योग्य नियोजनाअभावी गतवर्षीच्या तुलनेत धरणात कमी पाणीसाठा राहिला आहे.
मागील वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे भोर तालुक्यातील भाटघर व नीरा-देवघर ही दोन्ही धरणे ७० टक्केच भरली होती. तरीही नीरा-देवघर धरणात गतवर्षी ३२ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. याउलट, या वर्षी दोन्ही धरणे १०० टक्के भरूनही पाण्याच्या योग्य नियोजनाअभावी धरणातील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे.
सध्या दोन्ही धरणांतून बारामती व फलटण या तालुक्यांतील डाव्या व उजव्या कालव्यांना शेतीसाठी १० मार्चपासून नीरा-देवघर धरणातून ७६० क्युसेक्सने, तर भाटघर धरणातून २,००० क्युसेक्सने पाणी नीरा नदीत सोडले आहे. दोन्ही धरणे १०० टक्के भरली होती. नीरा-देवघर धरणातही २६ टक्केच साठा शिल्लक आहे.
५ गावे व ५ वाड्या-वस्त्यांना टॅँकरची गरज
नीरा-देवघर धरणभागातील रिंगरोड धारांबे, पऱ्हर खुर्द, पऱ्हर बुद्रुक, निवंगण, धानवली, शिरवली हि. मा., चौधरीवस्ती, मानटवस्ती तर महाड-पंढरपूर रोडवरील शिरगाव, सोमजाईवस्ती, सुईरमाळ, शिळींब, कुंड, कारुंगण यासह अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली आहे. जवळपास कुठेच पाणी उपलब्ध नसल्याने गावापासून ३ किलोमीटरवर असलेल्या धरणातून पाणी आणण्याशिवाय महिलांकडे कोणताच पर्याय नसल्याने पाण्यासाठी दिवसभर पायपीट सुरू आहे. दर वर्षी उन्हाळ्यात हेच काम महिलांना करावे लागत आहे. भोर पंचायत समितीकडे ५ गावे व ५ वाड्या-वस्त्यांनी टॅँकरची मागणी केली आहे. त्यामुळे त्वरित टॅँकर सुरू करण्याची मागणी लक्ष्मण दिघे व धोंडिबा मालुसरे यांनी केली आहे.
पावसाळा सुरू होण्यास अद्याप अडीच महिने बाकी आहेत. तसेच, धरणातील पाणीसाठा अत्यंत कमी झाल्याने दोन्ही धरणभागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.
भाटघर धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने धरणात असणाऱ्या विहिरींना पाणी कमी पडत असल्याने हर्णस, जोगवडी, आस्कवडी डेरे, म्हशीवली, कांबरे खुर्द, कुरुंजी यांच्यासह अनेक गावांतील विहिरीतील मोटर बंद पडत आहेत. त्यामुळे अनेक गावांत दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. तर, अनेकदा गाळमिश्रित पाणीपुरवठा होत आहे. दोन मोटरमुळे वीजबिल अधिक प्रमाणात येत आहे. नवीन पाईप घेणे, त्याला वायर व मजुरी ही कामे दर वर्षी उन्हाळ्यात करावी लागतात. मात्र, हे ग्रामपंचायतींना परवडत नाही.
- ज्ञानेश्वर नलावडे, उपसरपंच, कुरुंजी