सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गिरवले जाणार उर्दू अभ्यासक्रमाचे धडे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 10:00 PM2020-02-05T22:00:00+5:302020-02-05T22:00:02+5:30
या अभ्यासक्रमाद्वारे उर्दू वाचन , उर्दू लेखन , उर्दू श्रवण , उर्दू संभाषण अशी चार कौशल्ये शिकता येणार
पुणे: सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठात २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून एक वर्षाचा उर्दू फाउंडेशन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.इयत्ता दहावी, बारावी, पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येणार आहे.
पुण्यातील अॅड. सलीम शेख यांनी विद्यापीठात उर्दू अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत पाठपुरावा केला. त्यास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे प्रमुख डॉ.सदानंद भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून त्याबाबत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीमध्ये डॉ. अझमत दलाल, प्रा. अब्दुल बारी,उज्मा तसनीम, मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अंजली कुरणे यांचा समावेश होता. या समितीने अभ्यासक्रमाची रचना ठरवली असून त्यानुसार येत्या शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाद्वारे उर्दू वाचन , उर्दू लेखन , उर्दू श्रवण , उर्दू संभाषण अशी चार कौशल्ये शिकता येणार आहेत. या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया विद्यापीठाच्या नियमानुसार केली जाणार आहे. प्रत्येक बॅचमध्ये ३० विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. सध्या हे अभ्यासक्रम हिंदी विभागांतर्गत चालवले जाणार आहेत. तसेच प्रवेश प्रक्रियेबाबतची माहिती लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाणार आहे, अशी माहिती हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. सदानंद भोसले यांनी सांगितले.
.......................
उर्दू ही सुसंस्कृत आणि सभ्य भारतीय भाषा आहे. ती भारतीय सांस्कृतिक क्षेत्राचा महत्वाचा घटक आहे. भारतीय समाजाचे अधिक चांगल्या प्रकारे अवलोकन करण्यासाठी सद्यस्थितीत ही भाषा शिकणे आवश्यक आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने उर्दू अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
-डॉ. नितीन करमळकर,कुलगुरू,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ