धडे पाणी बचतीचे; काम उधळपट्टीचे!

By Admin | Published: December 17, 2015 02:17 AM2015-12-17T02:17:02+5:302015-12-17T02:17:02+5:30

महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांनी गुरुवारपासून १० टक्के पाणी कपात केली आहे. मात्र, महापालिकेचेच कर्मचारी पिण्याचे पाणी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या गाड्या

Lessons to save water; Work out of work! | धडे पाणी बचतीचे; काम उधळपट्टीचे!

धडे पाणी बचतीचे; काम उधळपट्टीचे!

googlenewsNext

- विश्वास मोरे,  पिंपरी
महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांनी गुरुवारपासून १० टक्के पाणी कपात केली आहे. मात्र, महापालिकेचेच कर्मचारी पिण्याचे पाणी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या गाड्या धुण्यासाठी वापरत आहेत, तसेच कार्यालयाचा परिसर स्वच्छ करण्यासाठी, महापालिकेच्या इमारतीच्या बांधकामासाठी पाण्याचा अपव्यय करीत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघड झाले. ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण’ अशी काहीशी अवस्था महापालिकेची झाली आहे. आयुक्तसाहेब, बेहिशेबी पाणी वापरणाऱ्यांवर कारवाई होणार का?

पावसाने ओढ दिल्याने पवना धरणातील पाणीसाठा ६५ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे मागील आठवड्यातील गुरुवारपासून (१० डिसेंबर) पाणीकपातीची घोषणा गटनेत्यांच्या बैठकीनंतर आयुक्तांनी केली. त्यानुसार १० टक्के कपात केली आहे. त्यानुसार दररोज पुरविण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या वेळेत सुमारे २० मिनिटांचा फरक पडला आहे, असे महापालिकेचे म्हणणे आहे. पाणीकपात झाली असली, तरी त्याचे देणे-घेणे महापालिकेला नसल्याचे दिसून आले. लोकमतच्या प्रतिनिधीने बुधवारी सकाळी ७ ते ११.३० या वेळेत पिंपरीतील महापालिका भवन, प्राधिकरणातील अ प्रभाग आणि फ प्रभाग कार्यालय, चिंचवड, तानाजीनगर येथील ब प्रभाग कार्यालय, नेहरुनगर येथील क प्रभाग, थेरगाव येथील ड प्रभाग कार्यालयात पाहणी केली. त्या वेळी गाड्या धुण्यासाठी पाणी वापरत असल्याचे आढळून आले.
पाणीकपात जाहीर करताना पाणीपुरवठा विभागाने फक्त नागरिकांसाठीच मार्गदर्शक तत्त्वे तयार केल्याचे दिसून आले. मात्र, महापालिकेकडून होणारा पाण्याचा अपव्यय आणि त्यावरील उपाययोजना सुचविल्या गेल्या नाहीत. नागरिकांनी आवश्यकतेनुसार नळ अर्धा किंवा पाऊण उघडावा. बेसिनखालील नियंत्रण कॉक हा आवश्यकतेनुसार नियंत्रित करावा, ज्यायोगे जास्त दाबामुळे होणारा पाण्याचा अपव्यय टाळता येईल. दोन नियंत्रणे असलेला फ्लशिंग टँक वापरावा. आपण शॉवरने अंघोळ करीत असाल, तर साबण लावण्याच्या वेळेस शॉवर बंद करावा. आवश्यक तेवढेच पाणी वापरावे. संपेल (जमिनीवरील पाण्याची टाकी) तसेच इमारतीवरील टाक्यांमधून पाणी वापरावे. घरातील नादुरुस्त नळ, पाइप, फ्लश त्वरित व वेळोवेळी दुरुस्त करावे. घराबाहेर जाताना नळ, फ्लश बंद आहेत ना, याची खात्री करावी, अशा सूचना केल्या. तसेच पाणीगळती आणि चोरी रोखण्यासाठी पथक नियुक्त केल्याचेही जाहीर केले. मात्र, प्रत्यक्षात पालिकेकडून होणारा पाण्याचा अपव्यय रोखण्याबाबत उपाययोजना झालेल्या नाहीत. वाढीव नळजोड बंद करणे, उद्यानांना पिण्याचे पाणी देणे बंद करणे हे निर्णय कागदावरच आहेत.

सकाळी
७.००
वाजतापालिका भवनात रांग
महापालिका भवनात कॅन्टीनशेजारी असणाऱ्या नळावरून पाणी घेऊन किंवा नळाला पाइप लावून गाड्या धूत असल्याचे दिसले. गाड्यांची छायाचित्रे घेताना
‘तुम्हा लोकांना आम्हीच दिसतो का?,
बड्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या गाड्या दिसत नाहीत का?’ असा प्रश्न प्रतिनिधींना केला.

सकाळी
८.००
वाजता
क प्रभागातही धांदल
संत तुकारामनगर येथील क प्रभाग कार्यालयात प्रवेश केल्यानंतर जिथे इमारत संपते, तिथे असणाऱ्या नळावरून पाणी बादलीत भरून चालक गाडी धूत होता. तसेच त्याने आपले कपडेही या वेळी धुवून काढले. त्यानंतर काही वेळ येथील नळ तसाच सुरू होता. त्याच्यानंतरही या ठिकाणी काही कार धुण्याचे काम सुरू होते.

सकाळी
८.४०
वाजता
मैला शुद्धीकरण केंद्र, भाटनगर
पिंपरीकडून चिंचवडकडे जाणाऱ्या भाटनगर येथील मैला शुद्धीकरण केंद्रावर सकाळी पाणी परिसर स्वच्छ करण्यासाठी वापरले जात होते. नळाला पाइप जोडून कार्यालय परिसरातून धूळ बसविण्यासाठी पाणी वापरले जात होते. एक जण पाणी मारत होता आणि दुसरे कर्मचारी हा प्रकार पाहत बसले होते.

सकाळी
९.३०
वाजता
ब प्रभाग कार्यालय, चिंचवड
तानाजीनगर, चिंचवड येथील ब प्रभाग कार्यालयात प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूला इमारतीच्या मागील बाजूस असणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा नळ तसाच सुरू होता. तर काही चालकांनी नुकत्याच आपल्या गाड्या धुतल्याचे दिसून आले. नियमितपणे येथे गाड्या धुतल्या जातात, असे एका कर्मचाऱ्याने सांगितले.

सकाळी
९.४७
वाजता
ड प्रभाग कार्यालय, थेरगाव
थेरगाव-औंध रस्त्यावरील जगताप डेअरी चौकाजवळील कार्यालयात प्रवेश केल्यानंतर समोरच पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत. येथून टँकर भरून शहरातील विविध भागांत नेले जातात. याच ठिकाणी टँकर येण्यापूर्वी अधिकाऱ्यांच्या गाड्या धुतल्या जातात, असे एका कर्मचाऱ्याने सांगितले.

अ आणि फ क्षेत्रीय कार्यालयात पाण्याचा अपव्यय
प्राधिकरण भेळ चौकातील अ प्रभाग कार्यालय परिसरातील नागरी सुविधा केंद्राशेजारी असणाऱ्या टाकीच्या नळावरून व्यवस्थितपणे पिण्याचे पाणी भरले जात नसल्याचे दिसून आले. हे पाणी कार्यालयाच्या प्रवेशद्वारातून बाहेर आल्याचे दिसले. तसेच काहींनी आपल्या दुचाकी गाड्याही धुतल्याचे दिसून आले. तसेच नळ काही वेळ खुला राहिल्याने मागील बाजूस पिण्याचे पाणी साचल्याचे दिसून आले. त्यानंतर निगडी टिळक चौकाजवळील क्षेत्रीय कार्यालयात गेल्यानंतर काही कर्मचारी प्रवेशद्वारावरच गाड्या धूत असल्याचे दिसून आले. तसेच महापालिका परिसरातील इमारतीच्या बांधकामासाठीही पिण्याचेच पाणी वापरत असल्याचे दिसून आले.

गाड्यांसाठी वाया जाते लाखो लिटर पाणी
महापालिकेच्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांसाठी सुमारे २०० गाड्या आहेत. तसेच कामावर येणारे कर्मचारीही मोठ्या प्रमाणावर चारचाकी आणि दुचाकी वाहने घेऊन कामावर येतात. सकाळी लवकर आणि सायंकाळी सहानंतर येथे कर्मचारीही आपली वाहने सार्वजनिक नळावर धुतात, असे एका कर्मचाऱ्याने बोलताना सांगितले. एक गाडी धुण्यासाठी किमान शेकडो लिटर पाणी लागते. त्यामुळे गाड्या धुण्यावर लाखो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे हा अपव्यय रोखणार कोण? पिण्यासाठी पाणी नाही म्हणून नागरिकांना पायपीट करावी लागत आहे.

गाडी धुण्यासाठी पाणी आणायचे कोठून?
‘लोकमत’च्या वतीने पिण्याच्या पाण्याचा अपव्यय या संदर्भात स्टिंग आॅपरेशन सुरू असताना काही चालकांनी आपल्या समस्या मांडल्या. ‘गाडी स्वच्छ नाही ठेवली, तर आम्हाला अधिकारी, पदाधिकारी बोलतात. आम्ही गाड्या धुण्यासाठी पाणी आणायचे कोठून?’ प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर गाड्या धुणे आणि अन्य कामांसाठी करणे आवश्यक असतानाही परिस्थिती मात्र वेगळीच आहे. महापालिका भवनातील कॅन्टीनशेजारी असणाऱ्या जागेत गाड्या धुण्यासाठी पूर्वी संपवेल होता. मात्र तो बंद आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना नाइलाजास्तव गाड्यांसाठी पिण्याचे पाणी वापरावे लागत आहे. प्रक्रिया केलेले पाणी उपलब्ध करून दिले, तर आम्ही त्याचाच वापर करू, असेही काहींनी सांगितले.

Web Title: Lessons to save water; Work out of work!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.